(योगातून मानसिक संतुलन – भाग २)
त्या दिवशी वैभव प्रथमच बालयोग वर्गाला आला. सोबत आई होती. “खूप मस्ती करतो ऐकतच नाही” आईची तक्रार होती. मी त्याच्याकडे पाहिले. खरेच तो चंचल होता. समोर उभा असतांनाही त्याच्या हाताची, पायाची, व मानेची हालचाल चालू होती. डोळे मीचमीच करीत होते. मी म्हणालो, “ठीक आहे, त्याला येऊदे वर्गाला. तुम्हीही या”
वैभव चे आईबाबाही दोन महिने योगाच्या वर्गाला होते. वैभव दोन वर्षे होता. आज तो २५ वर्षाचा आहे. परंतु कुणीही विश्वास ठेवणार नाही की हा लहानपणी चंचल होता. आज तो सभ्य आणि शांत व्यक्तिमत्त्वाचा तरुण आहे. त्याची आई आजही म्हणते, “योगामुळे तो शांत झाला. त्याला त्याची दिशा गवसली”
योग हे जीवन कसे जगावे हे सांगणारे शास्त्र आहे. “Its a way of life.” जीवनाचे असे कोणतेही अंग नाही ज्यास योग स्पर्श करीत नाही. ज्या मनामुळे इतक्या उलथापालथी होतात त्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे योग! अशा या मनाचा अभ्यास लहानपणापासूनच व्हायला हवा. जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा त्या जन्मासोबतच त्यास विशिष्ट स्वभाव प्राप्त होतो. त्या स्वभावास अनुसरून आणि त्याच्या संचित कर्मानुसार तो त्याच्या सभोवतालच्या जगातील माहिती त्याच्या पंच ज्ञानेंद्रियांतून आत्मसात करीत जातो. पुढे त्यातूनच त्याचे व्यक्तिमत्व घडत जाते. विशिष्ट विचार तो धारण करीत जातो. त्या विचारांवरच तो आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो. अशा ह्या विचारांवरच पुढे त्याची जीवन इमारत उभी होत जाते. असे हे विचार वास्तवावर आधारलेले नसल्यास ही विचारांची इमारत ढासळते आणि मग त्याचे तकलादू व्यक्तिमत्वही कोसळते. जीवनातील ही महत्वाची गोष्ट जर पालकांना समजली आणि ती त्यांना आपल्या मुलांना समजावता आली तर ती मुले पुढे जाऊन जीवाचे बरे वाईट करण्याचे धाडस करणार नाहीत.
वैभव योग वर्गाला आल्याने त्याला वेळीच शांत करता आले. त्यासाठी त्याच्या अंगी जी उत्स्फूर्त अशी ऊर्जा होती तीला योगिक खेळाच्या माध्यमातून वाट करून दिली. रोज वर्गाला आल्यावर मुलांचा एक खेळ घेतला जाई. त्यानंतर बैठा खेळ होई. उभ्याने होणाऱ्या खेळात हालचाल असे. त्यातून बरीचशी ऊर्जा बाहेर पडे. बैठ्या खेळात मुलांची सुदृढ मानसिकता तयार केली जाते. या खेळांत स्थिरता व एकाग्रता आवश्यक असते. तशी नसेल तर खेळ खेळता येत नाही. त्यासाठी आपण हरणार नाही याची काळजी वैभव घ्यायला लागला. त्यासाठी त्यास स्थिरता व एकाग्रतेची गरज भासू लागली. त्याच्या चंचल मनास न जुमानता तो ती साधण्याचा प्रयत्न करू लागला. परिणामी त्याच्या चंचल मनाचा प्रवाह योग्य दिशेने वळला. अर्थात हे एक दोन दिवसाचे काम नव्हते. त्यासाठी तब्बल दोन वर्षे लागली.
त्या खेळातून योगाची एखादी संकल्पना (विचार) स्पष्ट होण्यासाठी समूह चर्चा होई तेव्हा विचारांना दिशा मिळे व आपोआप योग्य विचारांची बांधणी सुरू होई. अशा विचारांच्या इमारतीचा पाया लहानपणीच पक्का झाला नाही तर पुढे समस्या उभी होणारच. स्वतःचा आत्मघात करणाऱ्या मुलाचे मूळ, त्याने लहानपणी धारण केलेल्या विचारातच दडलेले असते. विचारांची बांधणीतच काहीतरी चुक झालेली असते हे नक्की. लहान मुले आपल्या विचारांची बैठक कशी तयार करतात, हे पाहण्यासारखे आहे.
त्यांच्या शरीराची आणि मनाची वाढ होत असतांना त्याला येणारे अनुभव फार महत्वाचे असतात. त्यास येणाऱ्या या अनुभवांतूनच त्याचे व्यक्तिमत्व आकार घेत असते. ह्या महत्वाच्या टप्प्यावर त्यास योग्य मार्गदर्शक किंवा गुरुजी मिळणे आवश्यक असते. हे मार्गदर्शक त्याचे आई बाबा असतील तर खूपच चांगले. दुर्दैवाने असे मार्गदर्शन अनेक मुलांना त्यांच्या त्या त्या वयात मिळत नाहीत. पालकही विविध कारणे सांगत त्याच्यावरील ह्या संस्कारास दुय्यम स्थान देतात. काही मुलांच्या सुदैवाने वैभवसारखे आईवडील व गुरुजी मिळाले की ते भरकटत नाहीत. परंतु आज आपण काय बघतो…
१) आई बाबा दोघेही सार्विसच्या निमित्ताने घराबाहेर असतात.
२) विभक्त कुटुंबामुळे त्यास समजून घेणारे व समजावून सांगणारे आजी आजोबाही सोबत नसतात.
३) बंद फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारीही लक्ष द्यायला नसतात.
४) मुलांच्या मस्तीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या हाती मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट देऊन पालक त्यास आभासी दुनियेत गुंतवतात.
५ ) सुरक्षेच्या कारणास्तव मित्रांमध्ये खेळण्यास ते मनाई करतात.
६) मेरिट मध्ये येण्यासाठी त्यास ट्युशन लावतात.
७) बुद्धीस पोषक असे अन्न देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते.
याचे परिणाम खालील प्रमाणे होतात.
१) मुले एक तर अबोल होतात. नाहीतर खूप चिडखोर होतात. स्वतःस खोलीत कोंडून घेतात किंवा आदळाआपट करीत राहतात.
२) हेकट व हट्टी बनतात.
३) मोबाईलच्या किंवा टिव्ही च्या आभासी दुनियेत हरवून जातात.
४) काही मुले अंतर्मुख होतात. कुणाशी काही बोलत नाहीत. ही अंतर्मुखता सकारात्मक नसते. ती निराशेतून किंवा गोंधळातून निर्माण झालेली असते. आणि ती धोकादायक असते.
५) पब्जी सारखे गेम्स त्यांच्या हाती लागले, की मग मात्र बाह्य जगास ती पूर्ण विसरतात. ती आभासी दुनिया त्यांचे विश्व बनते. त्यातील सुख-दुखे ती आपली मानतात. त्या आभासी जगताचे ती एक घटक बनून जातात. त्यातून भीती, चिंता, चिडखोरपणा वाढत जातो. काही आक्रमक तर काही घोर निराशेच्या खाईत लोटली जातात. त्यातूनच त्या खेळातील पात्रांशी ती एकजीव होतात. आणि स्वतःचा जीव डावाला लावतात.
तसे किशोरवयीन आयुष्य खूपच सुंदर असते. नवीन मित्र, शाळा, खेळ, अभ्यास, गंमती जमती यात खरे तर रमण्याचे त्यांचे वय! परंतु एखादा मुलगा किंवा मुलगी स्वतःचा आत्मघात करून घेते त्यावेळी त्यांच्याबाबतीत फार मोठा अन्याय झालेला असतो हे निश्चित!
योग याकडे कोणत्या दृष्टीने बघतो हे पाहूया.
बालवयातच मुलांच्या मनाची जडणघडण नीट होईल याकडे पालकांनी लक्ष ठेवायला हवे. चार बाबतीत मुलांकडे पालकांचे लक्ष असायलाच हवे. आहार, विहार, आचार आणि विचार.
मुलांच्या खाण्यावर पालकांनी बारीक लक्ष ठेवावे. त्याच्या खाण्याच्या वेळा निश्चित कराव्यात. त्यासाठी पालकांनी याबाबत शिस्त पाळावी. आज घरापेक्षा हॉटेलमध्ये खाणे पालक अधिक पसंत करतात. बाहेरचे खाणे निश्चितच चांगले नसते. मुलांना अशी लहानपणापासूनच सवय लावल्यास ती घरचे खाणे पसंत करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक ते अन्नघटक पोटात जात नाहीत. आपले शरीर म्हणजे आपण जे खातो ते अन्न होय! अन्नामुळेच आपले शरीर बनते. त्याहून अन्नाचा जो सूक्ष्म भाग असतो त्यापासून रक्त व त्याहून सूक्ष्म भागातून विचार व आपले मन बनते. नियमित मांसाहार करणारे आपले बाळ संत होईल असे स्वप्न पाहणे चूक ठरेल. म्हणून आहार हा खूप महत्वाचा भाग आहे.
विहार मध्ये तीन गोष्टी येतात. झोप, विश्रांती आणि मनोरंजन. मुलांना किमान ८ तासांची झोप आवश्यक आहे. रात्री झोपण्याची वेळ निश्चित असावी. रात्री १० नंतर पालकांनीही जागू नये. मोबाईल किमान एक तास आधी बंद करावा. रात्री उशिरापर्यंत गेम खेळणाऱ्या मुलांचे भविष्य चांगले नसते. माझ्या नात्यातील (मेहूणीचा) मुलगा रात्री २ वाजेपर्यंत मोबाईलवर असतो. अशा मुलांचे भविष्य काय असेल ते सांगायला नकोच. मुलांना classical संगीत ऐकायची सवय लावावी. त्याने त्यांचे मन शांत व्हायला मदत होते. त्यांना नित्य नेमाने मंदिरात न्यावे, निसर्गाच्या सानिध्यात न्यावे. त्याने ती शांत होतात. विचार करू लागतात. याउलट त्यांना पार्ट्यांना नेऊ नये. गोंधळ असणाऱ्या उत्सवात नेऊ नये.
मुलांच्या वर्तनावर बारीक लक्ष ठेवावे. काही चुकीची कृती घडल्यास लगेच त्याला ती कृती ना ना मार्गाने लक्षात आणून द्यावी. त्याचे विचार प्रगल्भ होतील अशा उपक्रमात त्यास पाठवावे. मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करणारी अशी निवासी व अनिवासी शिबिरे भरत असतात. त्यात आपल्या मुलांना जरूर पाठवावे. असे केल्याने लहान मोठ्या तणावात आपली मुले खचणार नाहीत. उलट मोठ्या धीराने त्या प्रसंगाशी दोन हात करतील.
दिनेश पेडणेकर, योग शिक्षक, मंडणगड
मोबाईल 9420167413