(गणपतीपुळे/ वैभव पवार)
पर्यटन विकास आराखडा कार्यक्रमांतर्गत गणपतीपुळे गावाकरिता सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कामाचे भूमीपूजन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, प्रांताधिकारी विकास सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपकार्यकारी अभियंता प्रसाद सुर्वे, उपअभियंता ए.डी.चौगुले, गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पकये, उपसरपंच महेश केदार,गणपतीपुळे देवस्थानचे मुख्य पुजारी अमित घनवटकर, गणपतीपुळे ग्रा.पं.चे सर्व सदस्य, बाबू म्हाप, गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कामांर्गत आयडब्लूटीवर आधारित 7,50000 लिटर्स प्रतिदिन क्षमतेच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचा समावेश आहे. गणपतीपुळे येथे भूमीगत गटार वितरण व्यवस्थेसाठी 150 ते 250 मि.मी. व्यासाचे 8179 मी. लांबीचे पाईप्स टाकण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी 24 महिने इतकी कालमर्यादा असून काम पूर्ण झाल्यावर मक्तेदारामार्फत पुढील 5 वर्षासाठी ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली योजनेची देखभाल दुरुस्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी 8 कोटी 53 लाख 2 हजार 430 रुपयाची निविदा मंजूर करण्यात आली आहे.