( मुंबई )
डोंबिवली येथील एका तरुणाने सलग 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याच्या या रेकॉर्डची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
विशाक स्वामीने आज (31 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता विश्वविक्रमाला गवसणी घातली. या आधी सलग 60 दिवस 42 किमी धावण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होता. आता हा विक्रम विशाकने मोडत आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. विशाक स्वामी हा 29 वर्षीय तरुण डोंबिवलीतील स्टार कॉलनीमध्ये आपली आई, वडील आणि बहिणीसह राहतो. विशाक हा मूळचा केरळचा आहे मात्र त्याचं कुटुंब नोकरीधंद्यानिमित्त डोंबिवलीत स्थायिक झाले आहे. विशाक एका खाजगी विमा कंपनीत काम करतो. त्याची कंपनी बंगलोरला असल्याने तो सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे. सात वर्षापूर्वी विशाकला धावण्याची आवड निर्माण झाली. विशाकने धावणे सुरु केले. अनेक स्पर्धेत भाग घेत त्याने त्या स्पर्धा जिंकल्या. विशाकला त्याच्या आई आणि बहिणीचा देखील पाठिंबा मिळत होता.
सलग 21 दिवस दररोज 21 किलोमीटर धावण्याचा विक्रम देखील विशाकच्या नावावर आहे. हा विश्वविक्रम केल्यानंतर तो थांबला नाही. त्याने 61 दिवसांचा विश्वविक्रम करण्याची जिद्द ठेवली. डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात त्याने 1 सप्टेंबरपासून पुन्हा धावणे सुरु केले. दररोज पहाटे तीन वाजता विशाक डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणे सुरु करायचा. तीन वाजल्यापासून सुरु झालेलं त्याचे धावणे आठ वाजेपर्यंत सुरुच असायचे. सलग पाच तास न थांबता विशाक धावत होता. विशाक 42 किलोमीटर धावत होता. सतत 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावून त्याने या विश्वविक्रमाला देखील आज गवसणी घातली.
61 व्या दिवशी त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विश्वविक्रमाला गवसणी घालताच डोंबिवलीकरांनी ढोलताशांच्या गजरात त्याचे स्वागत केले. यावेळी विशाकने पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. माझे धावणे पुढे सुरु ठेवणार असल्याचे विशाकने यावेळी सांगितले. 61 दिवस झाले आता शंभर दिवसापर्यंत मी धावणार असल्याचे आत्मविश्वास विशाकने बोलून दाखवला.