सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. या काळात काही काळासाठी सूर्य चंद्राआड झाकला जातो आणि पृथ्वीवर काळोख पडल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. भारतात हे सूर्यग्रहण संध्याकाळी 4.30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.09 वाजता संपेल. सूर्यग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत व ग्रहणादरम्यान त्या पाळल्या पाहिजेत, अशी सामाजिक मान्यता आहे.
हिंदू धर्मातील पौराणिक मान्यतांनुसार सूर्यग्रहण हे राहु आणि केतूमुळे होते. हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक अमावस्या तिथीला म्हणजेच आज मंगळवारी 25 ऑक्टोबर 2022 रोजी सूर्यग्रहण होत आहे. ग्रहण काळात हिंदू धर्मातील अनेक लोक सुतकांचे नियम पाळतात. या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये असा एक समज आहे. तसेच ग्रहण काळात काही खाणे आणि पिणे देखील निषिद्ध मानले जाते. यावेळी भारतातील काही भागांमधील लोकांना सूर्यग्रहण पाहता येणार आहे.
काल रात्रीपासूनच सूर्यग्रहणाचे सुतक सुरू झाले आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी खास आहे. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण आज 25 ऑक्टोबर रोजी आहे. देशभरात दिवाळी साजरी होत असून काल रात्रीपासूनच सूर्यग्रहणाचे सुतक सुरू झाले आहे. हे सूर्यग्रहण अनेक अर्थांनी खास आहे. सूर्यमालेतील या अतिशय खास घटनेबद्दल सांगायचे तर 2022 मधील असे हे पहिलेच सूर्यग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध असेल. असं म्हटलं जात की, सूर्यग्रहणाच्या वेळी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सूर्यग्रहण पाहताना घ्या काळजी
सूर्यग्रहण पाहण्यासाठी कायम सुरक्षित पद्धतींचाच वापर करावा. सूर्याच्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते आणि यामुळे कायमस्वरुपी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी कधीच पाहू नये. सूर्यग्रहण काळात काही काळासाठी तुम्हाला सूर्यप्रकाश कमी झाल्याचे भासू शकते. मात्र या काळात देखील सूर्याची किरणे डोळ्यांसाठी धोकादायक ठरतात. त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यासाठ सुरक्षित पद्धतीचा वापर करावा. सूर्यग्रहण घरीच पाहायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील पाहू शकता. timeanddate.com या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल.
ग्रहण काळात हे काम करू नका
शास्त्रानुसार सूर्यग्रहण काळात काहीही खाल्ल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. अशा परिस्थितीत, या काळात शिजवलेले अन्न खाण्यास मनाई असते. या दरम्यान, कापण्याचे आणि सोलण्याचे काम देखील निषिद्ध मानले जाते. या काळात नखे कापणे, कंगवा करणे देखील शुभ मानले जात नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे ग्रहणकाळात कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य सुरू करू नये. सुतक लावण्यापूर्वी पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने आणि घरात तयार केलेले अन्नपदार्थ ठेवावेत, अशी मान्यता आहे.
गर्भवती महिलांनी लक्ष देणे आवश्यक
ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, तसेच या काळात चाकू, कात्री किंवा कोणतीही धारदार वस्तू वापरू नये. यासोबत सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे. कारण असे मानले जाते की, या सर्व गोष्टी केल्याने मुलावर वाईट परिणाम होतो.