( राजापूर / प्रतिनिधी )
तालुक्यातील मोसम येथील मधुसुदन सखाराम सरवणकर यांच्या घरावर वीज पडून नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सरवणकर यांच्या पत्नीला विजेचा किरकोळ धक्का बसला. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून आमदार राजन साळवी, तहसीलदार श्रीमती शीतल जाधव यांनी घटनास्थळी जाऊन झालेल्या घटनेची पाहणी केली. गेले दोन दिवस परतीच्या पावसाने तालुक्याला चांगलाच दणका दिला आहे. पावसासमवेत काही ठिकाणी विजादेखील कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पूर्व तालुक्यातील परिसरात योग कोसळल्याची घटना घडल्यानंतर शुक्रवारी मोसम येथेही सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान तेथील ग्रामस्थ मधुसुदन सखाराम सरवणकर यांच्या घरावर वीज कोसळल्याची घटना घडली. घराच्या कौलातून आत प्रवेश केलेल्या विजेचा धक्का सरवणकर यांच्या पत्नीला बसला व काहीसी इजा त्यांना झाली. नंतर एका वैद्यकीय पथकाने त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत सरवणकर यांच्या घराचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने रितसर पंचनामा करण्यात आला. या घटनेची माहिती। मिळताच आमदार राजन साळवी, राजापूरच्या तहसीलदार श्रीमती शीतल जाधव, मंडल अधिकारी अमित मोरे, गावचे तलाठी विनोद गुरव आदींनी घटनास्थळी भेट दिली.