(मुंबई)
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत स्वबळावर लढण्याची तयारी करा, मनसेकडे लोक पर्याय म्हणून पाहत आहेत असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. त्याचसोबत ६ एमवर लक्ष केंद्रीत करा असा कानमंत्रही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला. हे ६ एम म्हणजे मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मॅकेनिक असं त्यांनी म्हटलं. मॅकेनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करा. मेसेज म्हणजे आपले विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावे. मसल म्हणजे आपल्या ताकदीने लोकांपर्यंत जात आपले विचार त्यांच्यापर्यंत घेऊन जा आणि मनी लागेल तो आपण उभा करू, निवडणूक जिंकू असं बैठकीत सांगितले.
राज ठाकरे म्हणाले की, मी तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणार आहे. इतरांप्रमाणे स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही. आत्ताच्या राजकारणाला लोक कंटाळली आहे. त्यामुळे मनसेकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे आपले विचार सकारात्मक ठेवा. लोकांपर्यंत पोहचा असं त्यांनी सांगितले.
मनसे जरी स्वबळावर लढणार असली, तरी त्याचा फायदा भाजपला मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तर भाजप आणि मनसे यांची छुपी युती असल्याची चर्चाही आहे. आगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. तर मुंबई महापालिका जिंकायचीच असे नियोजन भाजपने केले आहे. त्यासाठी मनसे सोबत थेट युती केली तर मात्र भाजपच्या उत्तर भारतीय मतांना फटका बसेल, असा एक मतप्रवाह पक्षात आहे.