नॅशनल रुरल फाऊंडेशन बेळगाव आणि हेल्थ व नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमान कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतर्गत सामाजिक व शैक्षणिक सेवेसाठी दिला जाणारा मानाचा गौरव पुरस्कार रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय आयरे यांना जाहीर झाला आहे.
लांजा तालुक्यातील रिंगणे येथील श्री. आयरे यांनी विविध क्षेत्रात भरारी मारली आहे. सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षपदी काम करताना त्यांनी खेडेगावातील होतकरु गरीब विद्यार्थ्यांना माहीती तंत्रज्ञान या विषयाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक मुलांनी शिक्षणाचा मार्ग स्विकारला. सहकार क्षेत्रात वावरताना विकास सोसायटीच्या माध्यमातून गोरगरीब शेतकर्यांना शेतीपुरक जोडधंद्यास अर्थसहाय्य करुन आधुनिक शेतीकडे वळविण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन दिले. बाजार समितीमार्फत जिल्ह्यातील काजू बी शेतकर्यांसाठी शेतमाल तारण योजना राबवून शेतकर्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यात श्री. आयरे यांनी महत्त्वाची भुमिका बजावली आहे.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या अशाच कामांची दखल घेऊन नॅशनल रुरल फाऊंडेशन बेळगाव आणि हेल्थ व नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांनी मानाचा पुरस्कार श्री. आयरे यांना दिला आहे. याचे वितरण 31 मे रोजी बेळगाव येथे होणार आहे. याला केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, खासदार अमरसिंह पाटील, ब्रिगेडीअर सुधीर सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.