(मुंबई)
मागच्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. परतीच्या पावसाचे पोषक हवामान झाल्यानेच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात ददोन दिवस अंशत: ढगाळ हवामानासह काही तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. काल ब-याच ठिकाणी विजांंच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे आता हे परतीच्या पावसाचे संकेत असल्याचे मानले जात आहे.
राज्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. सध्या परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याचेही हवामान खात्याचे म्हणणे आहे. वाढती उष्णता आणि परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण पाहता लवकरच परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मान्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मागच्या आठवड्यात राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालियापर्यंतच्या भागातून मान्सून परतला आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नाही. मात्र, आता परतीसाठी पोषक हवामान झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मान्सून परत जाण्याची शक्यता आहे.
राज्यात जून महिन्यात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे. शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात बोटावर मोजण्याइतकी मोजकी धरणे वगळता राज्यातील बहुतांश धरणे तुडुंब भरले आहेत. राज्यातील २४ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.