(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील डॉ. नानासाहेब मयेकर फाऊंडेशन मालगुंड पुरस्कृत मोहिनी मुरारी शिक्षण संस्था आणि मालगुंड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक व माजी कार्याध्यक्ष, विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेले कै. डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा.मयेकर चाफे महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे. डॉ. नानासाहेब मयेकर यांनी आपल्या आयुष्यात उचित ध्येय नजरेसमोर ठेवून अतिशय निष्ठेने व त्यागी वृत्तीने अविरतपणे शिक्षणासाठी व समाजासाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना, कार्याला शिक्षण संस्थेच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे. सामाजिक ,शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केलेल्या कै.डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या स्पर्धा पुढील प्रमाणे- माझा आवडता नेता माझा, माझा आवडता खेळ, कुटुंब, राष्ट्र, निसर्ग या विषयावर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर भाषण स्पर्धा तसेच गौरव समारंभ, बक्षीस समारंभ, मित्राचा वाढदिवस, खेळाडूंचा सत्कार, काव्यवाचन समारंभ, जिल्हाधिकारी यांचा सत्कार सोहळा, निरोप समारंभ, क्रीडा स्पर्धा समारंभ अशा विषयांवर तिन्ही गटात सूत्रसंचलन स्पर्धा, तसेच माझे आवडते पुस्तक या विषयावर पुस्तक परीक्षण स्पर्धा तीन गटांत तर प्राथमिक गटात हस्ताक्षर स्पर्धा याशिवाय व्यसनमुक्ती, लोकसंख्यावाढ, प्रदुषण, लोककला या विषयावर व्यंगचित्र स्पर्धा दोन गटांत तर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा तिन्ही गटांसाठी हार्मोनियम, तबला, पखवाज वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या विविधांगी स्पर्धेत मालगुंड, जाकादेवी, काजुर्ली, चाफे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धेक सहभागी होणार आहेत.
यावेळी डॉ.नानासाहेब मयेकर यांनी स्वतः ला झोकून देऊन अतिशय दूरदृष्टीने, सामाजिक बांधिलकीतून केलेल्या उठावदार शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील देदीप्यमान कार्याचे स्मरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, तसेच डॉ. नानासाहेब मयेकर फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.सदरचा कार्यक्रम शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या स्पर्धांना विद्यार्थी, शिक्षक,परीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,शिक्षणप्रेमी नागरिक, हितचिंतक, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.नानासाहेब मयेकर फाऊंडेशनचे धडाडीचे कार्याध्यक्ष व युवा नेते रोहित मयेकर यांनी केले आहे.