देशात एकीकडे कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. तर दुसरीकडे देशातील सर्वच राज्यांत लसींंची कमतरता भासत आहे. परंतु, या सर्व परिस्थितीत केंद्र सरकारकडून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. दरम्यान, गुरुवारी निती आयोगाचे सदस्य व्हिके पॉल यांनी यावर्षीच्या ऑगस्ट ते डिंसेबरमध्ये 5 महिन्यांत 216 कोटी डोस देणार असल्याचे सांगितले आहे. पॉल पुढे म्हणाले की, एफडीए किंवा डब्ल्यूएचओने मंजूर केलेली कोणत्याही लसीला भारतात येण्यास परवानगी दिली जाईल.
पराराष्ट्र मंत्रालय जगातील इतरही लस उत्पादकांशी संपर्कात असून फायजर, मॉडर्ना आणि जॉनसन आणि जॉनसन यांचा आधीच सांगितले असल्याचे पॉल म्हणाले. दरम्यान, या कंपन्यांना आयात संबंधीची परवानगी एक ते दोन दिवसांत देण्यात येणार आहे. जर लस उत्पादक कंपन्या भारतात येऊन काम करत असतील त्याला केंद्र सरकार सहकार्य करणार असल्याचे पॉल यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात बाजारात येऊ शकते स्पुतनिक
देशात गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 17.72 कोटी डोस देण्यात आले. तर अमेरिका 26 कोटीसह प्रथम क्रमांकावर असून चीन दुसर्या स्थानांवर आहे. देशात पुढील आठवड्यापासून स्पुतनिक लस बाजारात उपलब्ध होणार असल्याचे पॉल यांनी सांगितले. रशियामधून गेल्या काही दिवसांपासून लसीचा पुरवठा कमी होता. परंतु, तो आता वाढणार असल्याचेदेखील ते म्हणाले.