( दापोली / प्रतिनिधी )
तालुक्यातील सुकोंडी सजाचे तलाठी अक्षय पाटील (30) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. जमीन मुलाच्या नावे करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
वडिलांनी मृत्युपत्राद्वारे दिलेली जमीन त्यांचे पश्चात आपल्या नावावर करावी यासाठी तक्रारदार यांनी तलाठी अक्षय पाटील यांच्याकडे अर्ज केला होता. याची नोंद दप्तरी करण्यासाठी तलाठी अक्षय पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. यामध्ये तडजोडीने करण्यात आली. तडजोडीअंती ७ हजार रुपयांवर तोडगा पाडण्यात आला. मात्र तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तलठ्याविरोधात तक्रार केली.
त्यानुसार अधिकाऱ्यांनी पडताळणी करून बुधवार 21 सप्टेंबर रोजी दुपारी १.५३ वाजता दापोली नगरपंचायतीच्या समोरील रस्त्यावर पंचासमक्ष तलाठी अक्षय पाटील यांना ७ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.