ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्या ब्रिटन आणि कॉमनवेल्थच्या इतिहासात सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या राणी होत्या. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात असून भारताने देखील त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
भारतानं एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिलेत. भारताच्या गृह मंत्रालयानं हा आदेश जारी केला असून 11 सप्टेंबरला संपूर्ण भारतात एक दिवसाचा शोक पाळला जाणार असल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
बर्लिंगहॅम पॅलेसमधून मिळालेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ द्वितीय गेल्या वर्षापासून एपिसोडिक मोबिलिटीच्या समस्येनं त्रस्त होत्या. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ राज्य केलं आहे. जवळपास ७० वर्षे त्या ब्रिटनच्या राणी होत्या. यूके रॉयल फॅमिलीच्या ट्विटर हँडलवरून काल अशी माहिती देण्यात आली की, “जगातील सर्वात वृद्ध राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं आहे.”
राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स यांना आता देशाचा नवा राजा घोषित करण्यात येणार आहे. प्रिन्स चार्ल्स हा राणी एलिझाबेथचा मोठा मुलगा आहे.