(खेड/प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ आंबये गावातील कुमार पंकज तुकाराम काताळे व प्रणव तुकाराम काताळे या दोन बंधूंनी गायन व संगीत क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पंकज व प्रणव हे गेली आठ वर्षे गायन व संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सांस्कृतिक कार्यक्रम भजन कीर्तन नमन भारुड आर्केस्ट्रा कोकणातील लोककला शक्ती तुरा तसेच मुंबई ठाणे पुणे अशा इतर मोठ्या शहरांमध्ये लाईव्ह कार्यक्रम करत आहेत.
पंकज याने नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे, तर प्रणव हा ज्ञानदीप विद्यामंदिर खेड येथे बारावी मध्ये शिकत आहे. विशेष म्हणजे हे दोघेही स्वतः गाणी तयार करून स्वतः गायन करतात. तर गाण्याला संगीतही स्वतः देतात. तसेच एक अभिमानास्पद गोष्ट आहे की, पंकज काताळे यांनी यावर्षी गौरी गणपतीच्या निमित्ताने स्वतः तयार केलेले गणपतीचे गाणे “हे गणा… आतुरली धरती आज सारी…!” हे गाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकणासह मुंबई पुणे ठाणे या मोठ्या शहरात ऐकायला मिळत आहे.
पंकज व प्रणव काताळे या दोन बंधूंची आज पर्यंत 11 गाणी यू ट्यूब वर पाहायला मिळत असून या गाण्यांना रसिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे. हे दोघे बंधू असे म्हणतात की, गायन व संगीत क्षेत्राची आवड आम्हाला आमचे वडील श्री तुकाराम भागोजी काताळे, प्राथमिक शिक्षक व आई सौ तृप्ती तुकाराम काताळे, प्राथमिक शिक्षिका यांच्याकडून प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले. कोकणातील लोककला टिकवून ठेवणे हाच आमचा उद्देश आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.