(रत्नागिरी/प्रतिनिधी)
कोकणच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर आणि खाडीलगतच्या भागांमध्ये सागरी सीमा मंचच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्हा प्रशासनासह 90 सामाजिक, धार्मिक संस्थांचे पंधरा हजाराहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्लास्टिक व पॉलिथिन मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता नियोजन करण्यात येत असून गावागावांमध्ये भेटी दिल्या जात असल्याची माहिती सीमा जागरण मंचाचे (दिल्ली) अखिल भारतीय सहसंयोजक मुरलीधर भिंडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभियानाच्या नियोजनासंदर्भात बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीत जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 सप्टेंबरला सर्व समाजाने एकत्रित येऊन समुद्रकिनारी स्वच्छ सागर तट अभियानात सहभागी व्हावे. कुटुंब, मित्र परिवार, सोसायटीतील रहिवासी, शाळा, कॉलेज सर्व स्तरावर याची माहिती देण्यात येत आहे, असे भिंडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्लास्टिक, पॉलिथिन कसे वापरावे, त्याचा पुर्नवापर कसा होईल याची दक्षता आपण घेतली पाहिजे. पर्यावरणाचा होणारा -हास आपण थांबविला पाहिजे. हीच काळाची गरज आहे, हे आपण ओळखावे व त्वरित जागे व्हावे. वृक्षारोपण करावे हे अत्यंत गरजेचे आहे. पर्यावरणाचा संतुलन आपण सांभाळला हवे, याकरिता नियोजन करण्यात आल्याचे भिंडा यांनी सांगितले. सामाजिक संस्था, सरकारी संस्था, सागर तट सुरक्षा रक्षक, अग्निशामक दल, नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस, कोस्टगार्ड, जीव रक्षक, प्लास्टिक पुन्हा वापर करणार्या कंपन्या, समुद्रकिनारी असलेली हॉटेल्स, समुद्रकिनारी राहणारे सर्व बांधव या सर्वांनी मिळून हे अभियान यशस्वी करूया, असे आवाहनही भिंडा यांनी केले.
५० ठिकाणी स्वच्छता अभियान राबिण्यात येणार
दक्षिण रत्नागिरीत नांदीवडे, मालगुंड, गणपतीपुळे (३ कार्यक्रम), आरे, काळबादेवी, ,मिर्या बीच, पांढरा समुद्र, मांडवी बीच, भाट्ये, कसोप, कुर्ली, वायंगणी, रनपार, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, वेत्ये, आंबोळगड, जैतापूर, साखरीनाटे येथे उत्तर रत्नागिरीत वेसवी, बाणकोट, उंबरशेत, उटंबर, आडे, लखडतर, हर्णे-पाज, लाडघर, लखडतर वाडी, बुरोंडी, दाभोळ, तरीबंदर, वेलदुर, असगोली, पालशेत, बुधल, बोर्या, कोंडकारूळ, वेळणेश्वर, साखरी आगर, हेदवतड, काताळे नवानगर कुडली या ठिकाणी अभियान राबवण्यात येणार आहे. तर शपथ कार्यक्रम जयगड कासारवेली, पावस आणि कशेळी येथे आयोजित केला गेला आहे.
सदर पत्रकार परिषदेला सागरी सीमा मंच प्रांत संयोजक संतोष पावरी, उत्तर रत्नागिरी संयोजक अमर पावशे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत आणि डॉ. प्रशांत अंडगे उपस्थित होते.