( रत्नागिरी / प्रतिनिधी )
प्रदुषण कमी करणे, अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढविणे, उद्योगधंद्यांच्या वीज वापरासाठी नवीकरणीय ऊर्जा निर्मितीवर भर देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केले.
ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य महोत्सव अल्पबचत भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुख्य अभियंता मा.श्री.विजय भटकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.परिक्षित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी आरजीपीपीएल एनटीपीसी चे मा.श्री.अे.के.सामंता, अधीक्षक अभियंता मा.श्री.नितीन पळसुलेदेसाई, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) मा.कल्पना पाटील, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) मा.शुंभागी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी मा.श्री.सत्यविनायक मुळे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्य मा.श्री. अे.के सामंता यांनी अपारंपरिक ऊजेचे महत्व विशद केले. या महोत्सवास मा.खा. विनायक राऊत, मा.आ. राजन साळवी, मा.आ. उदय सामंत यांनी शुभेच्छा संदेश दिले. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र प्रदान करण्यात आले.
जिल्हाधिकारी म्हणाले रस्ता, वीज, पाणी हे विकासकामांचे चक्र चालविण्यासाठीचे महत्वाचे अंग आहेत. यामध्ये वीज हे फार महत्वाचे अंग आहे. रत्नागिरी हा डोंगर, दऱ्यामध्ये वसलेला जिल्हा आहे. नैसर्गिक आपत्ती काळात महावितरणमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. या सर्व आपतकालीन परिस्थितीस सामोरे जाऊन सक्षम ऊर्जेचा स्त्रोत कायम ठेवण्याची महत्वाची भूमिका महावितरणने पार पाडली आहे. अपारंपारिक ऊर्जेचा स्त्रोत उद्योगधंद्यांना वाढविण्यासाठी, प्रदुषण कमी करण्यासाठी नवी व नवीकरणीय ऊर्जा निर्मितीवर भर देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सर्व शासकीय कार्यालयांचे सौर ऊर्जाकरण करण्यात येत असून त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयापासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा- महावितरणची योजना अंमलबजावणी
केंद्राच्या दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योति योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणाची ५८ कोटी ७९ लक्ष रुपयांची कामे करण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने ३३/११ केव्ही ओणी व साडवली ही दोन उपकेंद्रे उभारली आहेत. ३३/ ११ केव्ही लोटे उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचे एक अतिरिक्त रोहित्र बसविण्यात आले आहे. उच्च दाब ५८ किमी वीज वाहिनी, ११४ किमी लघुदाब वाहिनी, ११३ नवीन वितरण रोहित्रे इत्यादी कामे करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील १५४० दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना वीज जोडणी दिली आहे.
केंद्राच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून शहरी भागातील विद्युत जाळे सक्षमीकरण व विस्तारित करण्याचे ३६ कोटी ४९ लक्ष रुपयांची कामे रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात आले आहे. त्यातून ३३/११ केव्ही राजापूर उपकेंद्रातील ५ एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राची १० एमव्हीए क्षमतवाढ करण्यात आली. त्याचा जवळपास ३९ गावांना लाभ झाला आहे.३३/११ के.व्ही. झडगाव ( रत्नागिरी) उपकेंद्रामध्ये नवीन अतिरिक्त 5 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविल्याने रत्नागिरी शहराच्या वीज पुरवठा सक्षम झाला आहे. ७५ किमी नवीन उच्च दाब व ४३ किमी लघुदाब वीज वाहिनी , ११९ वितरण रोहित्रांची क्षमतवाढ करण्यात आलेली आहेत. ५० किमी एरियल बंच केबल टाकण्यात आली आहे.
केंद्राच्या सौभाग्य योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ३२६ ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.राज्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील ६९७ शेतकऱ्यांना कृषी पंप वाटप, उच्च दाब वितरण प्रणाली योजना व कृषी वीज जोडणी धोरणात १२३२ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिल्या आहेत.