(खेड / प्रतिनिधी)
भोस्ते घाटात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे. तरीही शासन, प्रशासन योग्य त्या उपाययोजना करताना दिसत नाही. भोस्ते घाटात रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीस्वार आणि कारला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि दरीच्या बाजूला पलटी झाला. सुदैवाने चालक या अपघातातून बचावला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोटे येथील एका ट्रान्सपोर्ट कम्पनीचा कंटेनर चिपळूण येथे माल भरून मुंबईकडे जायला निघाला होता. हा कंटेनर सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाट उतरत असताना रस्त्यातील स्पीड ब्रेकजवळ पुढे असलेल्या कार चालकाने अचानक ब्रेक लावला त्याच वेळी स्पीड ब्रेकवर दुचाकीस्वार आला. या दोघांनाही वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला आणि तो कंटेनर रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडला. सुदैवाने हा कंटेनर दरीवर थांबला अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. रविवारी झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर्स हे अपघाताचे कारण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर दर दोन दिवसाआड होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना आळा बसावा यासाठी करोडो रुपये खर्च करून महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम दर्जेदार आणि वेळेत झाले असते तर कदाचित महामार्गावर होणाऱ्या अपघातांना आळा बसला असता मात्र चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपन्यांनी चौपदरीकरणाचे काम करताना कामाचा दर्जा राखण्याऐवजी स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयन्त केल्याने चौपदरीकरांचे कामही रखडले आणि कामाचा दर्जा देखील खालावला. त्यामुळे अपघातांना आळा बसण्याऐवजी अपघातांमध्ये वाढ होऊ लागली. चौपदरीकरण झालेल्या रस्त्यावर अपघात होऊ लागल्यावर ठेकेदार कंपन्यांनी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर्स टाकले. वाहनाचा वेग कमी झाला की अपघातांना आळा बसेल यासाठी ही उपाययोजना असावी मात्र आता या स्पीड ब्रेकर्समुळेच अपघात होऊ लागले असल्याने महामार्गावर टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर्स त्वरित हटवावेत अशी मागणी होत आहे.