(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिदेेंचं बंड, 40 आमदारांचा शिंदेंना पाठींबा, नुकताच शिंदे गटात सामील झालेले 12 खासदार आणि शिवसेनेची सातत्याने होत असलेली गळती… आता हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न चालू आहेत. आदित्य ठाकरेंचा भिवंडीत मेळावा पार पडला. यात त्यांनी पुन्हा शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
टिव्हीवर येऊन सांगत आहेत आम्ही बंड नाही केलं, उठाव केला आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुखांशी गद्दारी नाही तर, माणुसकीशी गद्दारी केली आहे. हे जे सरकार आहे ते घटनाबाह्य आहे. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार हे लिहून घ्या, असं भाकीत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. आमचा कोणावरही राग नाही. सगळे आमचेच लोक आहेत. आता मात्र थो़डी जरी लाज वाटत असेल तर सगळ्या आमदारांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
युवासेनेला, महिला आघाडीला धमकी द्या कोण येतंय का पाहा, कोणी येणार नाही. आम्ही घाबरणारे शिवसैनिक नाही आहोत. तसं घाबरे असतो तर सुरत, गुवाहाटीत लपून बसलो असतो, असा टोला त्यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे आजारी होऊन बेडवर काय पडले त्यावेळी मी मुख्यमंत्री होऊ शकतो का असा विचार आला. याला निष्ठावंत म्हणतात का? आज जर बाळासाहेब असते, दिघेसाहेब असते तर यांना न्याय दिला असता?, असा सवालच त्यांनी शिंदे गटाला केला.
आमचं सरकार हे घटनेनुसार आलेलं आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करतोय. बोलून फक्त समाधान करायच तर करुन घ्या, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना पत्रकारांशी बोलताना दिलं.