भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सध्या कोणता शब्द सगळ्यात जास्त सर्वांच्या तोंडी आहे तो म्हणजे रेमीडेसिव्हर.
अमेरिकन बायोटेक कंपनी गिलियड सायन्सेस (वेक्लुरी या ब्रँड नावाने) आणि संसर्गजन्य रोगांच्या यूएस सेंटर फॉर डिजीज कंट्रोल आणि आर्मी मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने विकसित औषध सध्या भारतामध्ये कोरोनाव्हायरस रुग्णांचे मृगजळ ठरतेय. रिमडेशिव्हिर हे इंजेक्शनच्या स्वरूपात असून ते सरळ रुग्णांच्या शरीरात रक्तवाहिनीतून देत आहेत. हे औषध मूळतः हिपॅटायटीस सी (विषाणूमुळे लिव्हर खराब होणे) या आजाराच्या उपचारांसाठी २००९ साली विकसित केले गेले होते, पण याचा जास्त उपयोग दिसून आला नाही. त्यानंतर आफ्रिकेतील कांगो देशामध्ये आलेल्या इबोला व्हायरस वरती सुद्धा याचा वापर केला गेला, तिथेसुद्धा हे औषध जास्त परिणामकारक ठरले नाही, पुन्हा एकदा २०१४ साली आलेल्या मर्स (MERS ) या आजारावर पण याचे प्रयोग केले गेले पुन्हा या औषधाने निराशा केली. या सर्व अभ्यासाचा एवढाच निष्कर्ष निघाला कि हे औषध काही प्रमाणात सुरक्षित आहे.
रेमीडेसिव्हर नक्की कसे कार्य करते :
या अँटिव्हायरल औषधाचे मूळ रासायनिक गुणधर्म आरएनए विषाणूजन्य एंजाइमांना लक्ष्य करतात किंवा एखादया पेशीमध्ये आरएनए विषाणूच्या (उदा: कोरोनाव्हायरस) कमकुवत बिंदूवर हल्ला करतात. आरएनए पॉलिमरेज नावाचे एक एन्झाईम जे डीएनएच्या कॉपी चे रूपांतर आरएनए मध्ये करते, रिमडेशिव्हिर या आरएनए पॉलिमरेजवर आघात करते, ज्यामुळे पेशींमध्ये आरएनए लाखो प्रतिकृती (copies ) तयार होत नाहीत. म्हणजेच पेशीमध्ये जर कोरोनासारखा आरएनए विषाणू गेला असेल आणि तो तिथे स्वतःच्या लाखो प्रतिकृती तयार करत असेल तर हे औषध त्या प्रतिकृती तयार होण्याच्या क्रियेला थांबवते.
नक्की वाद कुठून सुरु झाला:
ऑक्टोबर 2020 मध्ये, अमेरिकेच्या एफडीएकडून रिमडेशिव्हिरला कोव्हीड-१९ च्या उपचारासाठी आपत्कालीन मान्यता दिली, आश्यर्य म्हणजे फक्त १००० रुग्ण सहभागी असलेल्या तुलनेने छोट्या चाचण्यांमधून आलेल्या निष्कर्षावरून या औषधाला मान्यता देण्यात आली याउलट जवळपास सर्वच लसींच्या चाचण्या या ४० ते ५० हजार रुग्णांवर झालेल्या आहेत. या औषधाच्या चाचणीवेळी अमेरिकेच्या राष्ट्रीय हेल्थ संस्थेने (NIH ) जी माहिती सादर केली होती त्यामध्ये असे सांगितले होते कि जर एखादा कोव्हीड-१९ रुग्ण १५ दिवसांत बारा होत असेल तर रिमडेशिव्हिर औषध घेतल्याने तो ११ दिवसात बरा होतोय, पुढे हेच प्रमाण १० दिवसांवर आले. यामध्ये अतिशय गंभीर कोव्हीड-१९ आजारी रुगांबद्दल कोणतीही माहिती दिली गेली नव्हती. एप्रिल २०२० मध्ये याच्या चाचण्या मुखत्वेकरून अमेरिका, युरोपियन देश,दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, चीन, जपान या देशांत झाल्या होत्या, त्यावेळी यामध्ये भारताचा समावेश नव्हता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने (WHO ) पुन्हा एकदा मोठया प्रमाणावर (५००० पेक्षा अधिक) रुग्णसंख्या घेऊन या औषधाच्या चाचण्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्या गंभीर रुग्णांवर घेतल्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या अभ्यासाच्या अंतरिम निकालांच्या आधारे, आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार निष्कर्ष काढला गेला की रेमीडेसिव्हर दिल्याने कोव्हीड-१९ गंभीर रुग्णांचे एकूण मृत्यू, तसेच वेंटिलेशन वेळ आणि हॉस्पिटलमधील एकूण मुक्काम कालावधी यामध्ये कोणताही फरक पडला नाही. याला प्रत्युत्तर म्हणून रेमीडेसिव्हर तयार केलेल्या कंपनीने त्यांच्या स्वतःच्या चाचण्या पुन्हा घेतल्या आणि त्याचे निष्कर्ष ऑगस्ट २०२० मध्ये जाहीर केले. त्यामध्ये त्यांनी दोन वेगवेगळ्या रुग्णांचे गट केले, पहिल्या गटामध्ये ज्यांना कोव्हीड-१९ चे निदान ५ दिवसांपूर्वी झाले आहे त्याना घेतले तर दुसऱ्या गटामध्ये १० दिवसांपूर्वी कोव्हीड-१९ चे निदान झालेले रुग्ण घेतले. त्याना असे आढळून आले कि 5-दिवसीय रेमीडेसिव्हर गट अधिक जलद सुधारला, परंतु याउलट १० दिवसांच्या गटामध्ये ते घडले नाही. याचा निष्कर्ष असा निघाला कि ज्याना कोव्हीड-१९ चे निदान झालेय आणि लगेचच त्यांना रेमीडेसिव्हर दिले तर ते बरे होतायत मात्र जितके हे औषध द्यायला उशीर होईल तेवढी त्याची परिणामकारकता कमी कमी होतेय. याचाच सरळ सरळ अर्थ हा होतो कि गंभीर कोव्हीड-१९ रुग्णांसाठी रेमीडेसिव्हर हे फक्त मृगजळच आहे.
भारतामध्ये रेमीडेसिव्हर कसे काय एकदम चर्चेत आले:
मूळ अमेरिकन बायोटेक कंपनी गिलियड सायन्सेसने रेमेडेव्हिव्हरच्या पुरवठ्यात आणखी विस्तार करण्यासाठी इजिप्त, भारत आणि पाकिस्तानमधील जेनेरिक औषधनिर्माण कंपन्यांना विशेष स्वेच्छेने परवाना देऊन उप्त्पादन करण्यास परवानगी दिली. जोपर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कोव्हीड-१९ हा आजार संपला असे जाहीर करत नाही तोपर्यँत ना नफा ना तोटा या करारानुसार हे औषध या कंपन्या उत्पादित आणि १३० देशात (युरोप आणि अमेरिका सोडून) विकसनशील आणि अविकसित देशात वितरित करू शकतील, दुर्दवाने अशा या आणीबाणीच्या काळात कंपन्यांनी आणि औषध वितरकांनी अफाट नफा मिळवला.
रेमीडेसिव्हरचे फायदे आणि तोटे:
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि गिलियड सायन्सेसने केलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांत असे दिसून आले कि जर कोव्हीड-१९ च्या रुग्णास अगदी सुरवातीस हे (पहिल्या दिवशी २०० मिलिग्रॅमआणि पुढील प्रत्येक दिवशी 100 मिलिग्रॅम) औषध दिले तर त्याचे फायदे दिसून येतायत. दुसरे म्हणजे रुग्नांना जेवढी विषाणूची मात्र कमी तेवढी या औषधाची परिणामकारकता अधिक, सुरवातीची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांमध्ये याची परिणामकारकता इतर औषधांपेक्षा ३१% अधिक आहे. याउलट हे औषध गंभीर रुग्णांवर परिणामकारक नाही. या औषधाच्या अधिक मात्रेमुळे रुग्णांची श्वसनसंस्था निकामी होणे, अवयव अशक्त होणे, लाल रक्त पेशी कमी संख्या कमी होणे, रक्तदाब कमी होणे, मळमळ, उलट्या, घाम येणे किंवा थरथरणे असे दुष्परिणाम दिसून येतायत. आत्तापर्यन्त या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या या युरोप, अमेरिका, कॅनडा, जपान यासारख्या विकसित देशात झाल्या आहेत, जिथे आधीपासूनच आरोग्य व्यवस्था चांगली आहे, विकसनशील आणि अविकसित देश यांच्यामध्ये या औषधाच्या चाचण्या फारच कमी झाल्यात मात्र तिथेच हे औषध जास्त प्रमाणात वापरले जातेय. अमेरिका, युरोप मध्ये काही पूर्व अस्तित्वातील हृदयरोग रुग्नांना हे औषध दिल्यावर हृदयविकाराचा झटका आलेला दिसून आला त्यामुळे हे औषध दिल्यानंतर आणि रुग्ण कोव्हीड १९ मधून बरा झाल्यानंतरसुद्ध त्याच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जर भारतामधील तसेच महाराष्ट्रमधील आजच्या रिस्थितीचा विचार केला तर जो आता कोरोनाव्हायरसचा स्ट्रेन आहे, त्याची सुरवातीची लक्षणे दिसण्यास १० दिवस लागतायत आणि पुढील १० ते १४ दिवसांमध्ये तो गंभीर लक्षणांचे स्वरूप घेतोय, त्यामुळे हे औषध अशा रुग्णांसाठी फक्त मृगजळच ठरतेय. अमेरिकन केमिकल सोसायटी आणि ब्रिटिश मेडिकल जर्नल च्या रिपोर्टनुसार जगात सर्वच देशात कोव्हीड १९ रुग्नांना रेमिडिसीव्हर बरोबर इतरहि अँटिव्हायरल औषधे दिली जातायत त्यामुळे एकटे रेमिडिसीव्हर हेच औषध रुग्णांना उपयोगी आहे कि नाही याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.
रेमिडिसीव्हियर कुणाला दिले पाहिजे?
आंतरराष्ट्रीय नियमावली
१. ज्या लोकांचे वय १२ वर्षापेक्षा अधिक आहे, तसेच दवाखान्यात ऍडमिट केलेल्या रुग्णाचे वजन ४० किलो पेक्षा अधिक आहे.
२. सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे दिसून १० दिवस झालेत त्यांना रेमिडिसीव्हियर देण्यात येऊ नये
३. रुग्णांना जास्तीत जास्त पाच दिवसच हे औषध दिले पाहिजे.
४. पहिल्या दिवशी २०० mg चे इंजेक्शन तर त्यापुढील ४ दिवस रोज जास्तीत जास्त १०० mg चे डोज दिले पाहिजे. याच्यापेक्षा अधिक मात्रेचा डोज दिला तर रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
५. निरोगी व्यक्तीने कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून रेमिडिसीव्हियर घेऊ नये, त्याने संसर्ग रोखता येत नाही, याउलट त्याना सुद्धा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
डॉ. नानासाहेब थोरात,
मेरी क्युरी वरिष्ठ शास्त्रज्ञ
मेडिकल सायन्स डिव्हिजन,
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड.