(रत्नागिरी)
कोल्हापुरातील एका भामट्याने स्वतः ची पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण अॅकॅडमी काढून रत्नागिरीतील पोलिस भरतीत तुम्हाला भरती करतो असे सांगून लाखो रुपयांना लुटल्याची घटना समोर आली आहे. विजय लक्ष्मण व्हरांबळे (रा. गोळीबार मैदान, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या भामट्याने नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय व्हरांबळे याने काही दिवसांपुर्वी डमी उमेदवार लेखी परिक्षेला बसवून पोलीस दलात चालक म्हणून भरती केला. या डमी उमेदवाराला पोलीसांनी अटक केल्यानंतर पुन्हा एकदा रत्नागिरीतील पोलीस दलात भरती करण्याच्या अमिषाने पैसे उकळण्याचा प्रयत्न व्हरांबळे करत होता.
महाराष्ट्र पोलिस दलांसह रेल्वेमध्ये शिपाई, सुरक्षारक्षक तसेच टी.सी. क्लार्क म्हणून नोकरीला लावण्याच्या आमिषाने कोल्हापूर पेठ येथील तरुणासह त्याच्या साथीदाराकडून 7 लाख 75 हजार रुपये उकळल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार विजय व्हरांबळे या संशयितावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला.
जानेवारी 2019 ते डिसेंबर 2021 या काळात कसबा बावडा येथील गोळीबार मैदानाजवळील व्हरांबळे अकॅडमीमध्ये हा प्रकार घडला. व्हरांबळे याने अनेक सुशिक्षित, बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संशयित व्हरांबळे याने सुरू केलेल्या अकॅडमीमध्ये अविनाश अशोक माने (वय 27, रा. सोमवार पेठ) याच्यासह त्याच्या सहकारी मित्रांनी प्रवेश घेतला होता. ते सर्व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासह मैदानावर सराव करीत होते. त्याचवेळी व्हरांबळे याने रत्नागिरी येथे पोलिस भरती सुरू आहे. लेखी परीक्षेत मदत करून पोलिस दलात भरती करतो, असे सांगून अविनाश माने याच्याकडून 3 लाख 50 हजार व अन्य साथीदारांकडून उर्वरित रक्कम अशी एकूण 7 लाख 75 हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पैसे उकळूनही नोकरी लावण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या व्हरांबळेकडे तरुणांनी रक्कम परत मागितली. मात्र त्याने दमदाटी करण्यास सुरुवात केली, असेही तक्रारीत म्हटले आहे. अविनाश माने याने दिलेल्या तक्रारीनुसार व्हरांबले याला कोल्हापूरात शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यामुळे त्याच्याकडून कोल्हापुरातील आणखी किती तरुणांना रत्नागिरी पोलिस भरतीत लावतो सांगून गंडा घातला हे उघड होणार आहे.