(प्रतिनिधी / लांजा)
लांजा येथील बौद्धवाडी वस्ती शेजारी प्रभाग क्रमांक ४ मध्ये कचरा प्रकल्प (डंपिंग ग्राउंड) सुरू करण्यात आला आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत. श्वसनाचे त्रास नागरिकांना जाणवू लागले आहे. वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे येथील कचरा प्रकल्प बंद करावा यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
लांजा बौद्धवाडी येथील ग्रामस्थांच्यावतीने लांजा नगर पंचायतीला हा प्रकल्प तत्काळ बंद करण्यासाठी सोमवार १३ जून रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नगरपंचायतीला सादर करण्यात आलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, आमचे बौद्ध वाडी वस्ती शेजारी प्रभाग क्रमांक ४ मध्ये असलेल्या जमिनीत नगर पंचायतीमार्फत कचरा टाकला जात आहे. नगरपंचायतीची कचरा गाडी दुर्गंधीयुक्त ओला-सुका कचरा या ठिकाणी टाकत आहेत. या कचऱ्यामुळे रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगाची लागण होण्याची भीती आहे. याबरोबरच वाडीतील जनावरे व भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात या डम्पिंग ग्राउंडवरील अन्न पदार्थ खातात. शिवाय कचराही इतरत्र पसरत असल्याने दुर्गंधी येत आहे. तसेच दिनांक २६ मे रोजी वाडीतील रहिवासी नितीन काशिराम कांबळे यांची गिरी जातीची गाय कचरा खाऊन मृत्यूमुखी पडली. त्यांचे पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई नगरपंचायतीने भरून द्यावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच नगरपंचायतीने सध्या सुरू केलेला कचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) रहिवाशांच्या आरोग्याचा विचार करून त्वरित बंद करावा अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनावर राजेश कांबळे, सुशांत कांबळे, प्रदीप कांबळे, दिलीप कांबळे, राजेंद्र कांबळे, नितीन कांबळे, मिलिंद कांबळे, शुभम कांबळे, सुरेश कांबळे, शिवाजी कांबळे, रवींद्र कांबळे, संदेश कांबळे, नवनीत लांजेकर, केतन कांबळे, आदित्य कांबळे, गणपत कांबळे, के.पी. कांबळे, निखिल कांबळे, निशांत कांबळे, अविनाश कांबळे, अक्षय कांबळे आदींच्या सह्या आहेत.