(जाकादेवी/वार्ताहर)
न्यू इंग्लिश स्कुल व माँसाहेब मीनाताई ठाकरे ज्युनियर कॉलेज नेवरेच्या मुख्याध्यापकपदी श्री. बबन राजाराम तिवडे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कलाशिक्षक मुख्याध्यापकपदी नियुक्ती होण्याची बहुदा ही रत्नागिरी जिह्यातील पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
श्री. बबन राजाराम तिवडे यांचे मूळ गाव कोथळी, ता. शिरोळ जि. कोल्हापूर आहे. त्यांचे शिक्षण कलाविश्र्व महाविद्यालय, सांगली व दळवी ज स्कूल ऑफ आर्ट, कोल्हापूर येथे झाले. विशेष म्हणजे त्यांची कलाशिक्षक म्हणून ३६ वर्षे सेवा झाली असून रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून २० वर्षे तर महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ पुणे कोकण विभागीय सचिव म्हणून १ वर्षे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळ पुणे येथे लेखन मंडळामध्ये ५ वर्षे, बालभारतीमध्ये २ वर्षे, रत्नागिरी तालुका कलाध्यापक संघ रत्नागिरीचे ते सल्लागार म्हणूनही अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत आहेत.अत्यंत धडपडणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ख्याती आहे.
अशाप्रकारे अनेक क्षेत्रात उत्तम काम करण्याचा अनुभव असणारे कलाशिक्षक श्री. तिवडे यांनी १ जून रोजी न्यू इंग्लिश स्कुल व माँसाहेब मीनाताई ठाकरे ज्युनियर कॉलेज नेवरे येथे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार स्वीकारला. ज्येष्ठ कलाध्यापक व विद्यार्थी प्रिय शिक्षक बबन तिवडे यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचे नेवरे -धामणसे शिक्षण संस्थेसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.