(देवरुख/सुरेश सप्रे)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती जिल्हा दक्षिण रत्नागिरीच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील बामणोली कातळ स्टॉप येथे बावनदीतील गाळ उपशाला शनिवारी सकाळी प्रारंभ झाला आहे. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन जनकल्याण समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर धामणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
गतवर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका बामणोली गावाला बसला. पावसाचे पाणी शिरल्याने घराचे व शेती वाहून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे पुन्हा यावर्षी पुरामुळे घर व भातशेतीचे नुकसान होऊ शकते. यामुळे बामणोली बौद्धवाडी विहिर ते कातळ स्टॉप या भागातील गाळ उपसा करण्याची मागणी ग्रामस्थांची होती.
ही बाब जनकल्याण समिती पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच समितीचे कार्यवाह महेश नवेले, संतोष जोशी, शंकर धामणे, सुरेश करंडे व बापू चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली केली. प्रांत स्तरावर पत्र व्यवहार केल्यानंतर गाळ उपसा करणेसाठी निधी प्राप्त झाला आहे.
गाळ उपसा करण्यास शनिवारी सकाळपासून प्रारंभ झाला आहे. श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जनकल्याण समितीचे शंकर धामणे, सुरेश करंडे, बामणोली गावचे प्रदीप गुरव, विलास गुरव, यशवंत गुरव, किशोर जाधव, अनंत मुंगटवार, बापू मांडवकर, द्रौपदी चव्हाण, सुरेखा मुडेकर, शुभम शिंदे, शोभा जाधव, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. जनकल्याण समितीच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल बामणोलीसह तालुकावासियांनी कौतुक केले आहे.