(रत्नागिरी)
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे रत्नागिरी दौऱ्यात म्हणाले, राजे आणि राजांच्या गादीचा मान भाजपने राखला होता. त्यामुळे भाजपने संभाजीराजेंना डावलेले नाही. संभाजीराजे यांना दिलेला शब्द शिवसेनेने फिरवला, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राजेंना कोणी फसवले? याचा आता जनतेने विचार करावा.
संभाजीराजे हे राजे आहेत. राजे आणि राजांच्या गादीचा मान भाजपने चांगला राखला होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग न घेता मी प्रदेशाध्यक्ष असताना राष्ट्रपती कोट्यातून सन्मानाने निवडून आणले होते. आता संभाजीराजे यांनीच शिवसेनेने शब्द फिरवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जनतेनेच ठरवावे की, संभाजीराजे यांना कोणी फसवले? असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुकीवरून जोरदार राजकारण तापले आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेने पक्षप्रवेशाचे निमंत्रण देऊन उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र संभाजीराजे यांनी स्वाभिमान ठेवत सेनेने आपला शब्द फिरवला, असे स्पष्ट करून प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शिवसेना पक्षाने अपक्षांना पाठिंबा न देता थेट कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने संभाजीराजे यांना फसवल्याचा आरोप केला. यावरून आता जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.