(मुंबई)
कोरोना काळात अपुऱ्या मनुष्य बळामुळे सरकारी आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला होता. कोरोना चा संसर्ग आता कमी झाला असला तरी भविष्यात आरोग्यासंबंधी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्यसेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या संवर्गातील 10 हजार 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित जिल्हा निवड समितीमार्फत ही भरती करण्यात येणार असल्याची, माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडील गट- क संवर्गांपैकी आरोग्य विभागाशी संबंधित पदांची भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरच घेण्याबाबतची प्रक्रिया तत्काळ सुरु करण्याबाबत सर्व जिल्हा परिषदांना आदेश देण्यात आला आहे. 2019 च्या जाहिरातीनुसार, आलेल्या अर्जातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आतापर्यंत 400000 अर्ज आले असून, या अर्जाद्वारे उमेदवारांची परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता तातडीने सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य पर्यवेक्षकांची 47 पदे, औषध निर्मात्याची 324 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची 96, आरोग्यसेवकाची 3 हजार 184 पदे आणि आरोग्यसेविकांची 6 हजार 476 पदे अशी एकूण 10 हजार 127 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.