(लांजा)
शासनामार्फत पाणीटंचाई दूर करण्यासाठी लांजा तालुक्यात लाखो रुपयांचा पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. मात्र दरवर्षी लाखो रुपये खर्ची करूनही पाणीटंचाई अद्यापही कमी झालेली नाही. लांजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईची झळ कोचरी, भोजवाडी, चिंचुर्टी व कोंडगे येथील ग्रामस्थांना बसत आहे. लांजा पंचायत समिती मार्फत टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
ग्रामस्थांचे पाण्याविना होणारे हाल लक्षात घेऊन लांजा पंचायत समितीमार्फत या गावात ४ मे पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे . मात्र टॅंकरद्वारे उपलब्ध होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. गावात टॅंकर पाणी घेऊन आल्यानंतर पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची अक्षरशः झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लांजा तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील पाणीटंचाईचे प्रश्न कधी निकाली निघणार असा सवाल या गावातील ग्रामस्थांतून विचारला जात आहे.