भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर येत्या दोन दिवसात दुसरी यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जागांचा समावेश आहे. महायुतीतील घटक पक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू असताना भाजपकडून काही उमेदवारांची नावे निश्चित झाली असल्याचे समजते. तर कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात कागलच्या राजघराण्यातील समरजीत घाडगे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र भाजपच्या वतीने केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत २५ जागांचे सादरीकरण केलं गेलं. या बैठकाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे आदि महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासमोर महाराष्ट्रातील नेत्यांनी जागांचे सादरीकरण केलं. या भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत आठ नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
बीड येथून भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना लोकसभा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. काल रात्री उशिरा झालेल्या भाजपच्या बैठकीत ही नावे ठरली असल्याचं सांगण्यात येत आहे.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेली नावे –
नागपूर- नितीन गडकरी
जालना- रावसाहेब दानवे
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार
पुणे- मुरलीधर मोहोळ
सांगली- संजय काका पाटील
भिवंडी- कपिल पाटील
दिंडोरी- भारती पवार
बीड- पंकजा मुंडे
तसेच कोल्हापूरमधून जर जागा भाजपच्या वाट्याला आली नसल्यास समरजीत घाटगे यांना शिवसेनेच्या चिन्हावर मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1