(खेड / प्रतिनिधी)
खेड नगरपरिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबत 24 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली. डिसेंबरमध्ये 9 प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे देवून 4 महिन्यांचा कालावधी लोटूनदेखील अद्याप कार्यवाही झाली नाही याचे नवल वाटते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
खेडेकर यांच्या विरोधात 18 डिसेंबर 2022 रोजी 9 प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. त्यातील काही प्रकरणात चौकशी सुरू असून या नवीन प्रकरणामुळे 18 प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरपरिषद हद्दीतील नगरोत्थान योजनेंतर्गत विकासकामांच्या ठेकेदाराच्या खाली नमूद केलेल्या देयक पदानासाठी नमुना 64 वर एका देयक पदानासाठी खेडेकर यांनी स्वत: एकट्याने सही केली असल्याचे कदम यांनी सांगितले.
अन्य देयक पदानात नगर परिषद लेखा संहितेनुसार अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सह्या नसताना स्वत:ची अंतिम स्वाक्षरी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. सहाय्यक अनुदान अंतर्गत विकासकामांच्या ठेकेदाराच्या करारनाम्यावर बेकायदेशीर सही करत माजी नगराध्यक्ष खेडेकर व माजी नगरसेविका मानसी चव्हाण यांनी पदाचा दुरूपयोग व गैरवापर केला आहे. खेडेकर यांनी खेड अंतर्गत विकासकामांच्या ठेकेदाराच्या बिलावर एकट्याना सही करून बिले अदा केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष खेडेकर यांनी नगराध्यक्षपदाही दुरूपयोग करून नगरपरिषदेसह शासनाचीही फसवणूक केली आहे. नगरपरिषद खर्चातून ठराव न करता चालकाला मानधन अदा केले. अशी 9 प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले आहेत. मात्र 4 महिने लोटूनदेखील अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांनी तपासून घेवून तत्कालीन नगराध्यक्ष खेडेकर यांच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.