(मुंबई)
राष्ट्रवादीतील बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे. शनिवारी नाशिकच्या येवल्यातून त्यांनी राज्यव्यापी सभेला सुरुवात केली. शरद पवार यांनी पक्षातील फुटीनंतर प्रथमच येवला मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. मुंबईत पराभूत झाल्यानंतर भुजबळांना मी येवला मतदारसंघातून उमेदवारी दिली, असे पवार म्हणाले.
मी तुम्हाला चुकीचा उमेदवार (छगन भुजबळ) दिला याबद्दल तुमची माफी मागतो असे पवार यांनी भाषणात म्हटले. यामुळे दुखावले गेलेले छगन भुजबळ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर पुन्हा हल्ला चढविला. ते म्हणाले की, 2014, 2017, 2019 अशा तिन्ही निवडणुकींच्या वेळी शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचे आश्वासन देताना शिवसेनेची युती तोडा, अशी अट घातली होती. राजकीय निर्णयाच्या सर्व बैठका झाल्या तेव्हा प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि नंतर जयंत पाटील हेच उपस्थित असायचे. मी यात कुठेही नव्हतो. तरीही पक्ष फोडण्यामागे मीच आहे, अशी शरद पवारांची समजूत का झाली? त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यापासून इतर सर्व नेत्यांच्या मतदारसंघातील सभा रद्द केल्या आणि फक्त माझ्याच मतदारसंघात सभा का घेतली? शरद पवार कोणाकोणाची माफी मागत फिरणार आहेत? असे ते म्हणाले.
६५ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं, ही सगळी मंडळी तुम्हाला सोडून गेलीत, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल का गेले, हे सर्व सगळं भूजबळांनी घडवून आणलं असं पवारसाहेबांना वाटतं, पण ही चुकीची कल्पना आहे, असे भुजबळ म्हणाले. पवारांना राजीनामा मागे घ्यायचा होता, तर मग राजीनामा का दिला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद पवार साहेब तुम्ही येवल्याला का आलात, हे मला कळलच नाही. मी ओबीसी आहे, म्हणून आलात का?. अहो हे बंड मी घडवून आणलेले नाही, ते तुमच्या घरातून सुरू झाले. मला हेच कळलं नाही की ते का आले. मला वाईट वाटलं की तुम्ही माफी मागताय. तुम्ही अशी किती ठिकाणी माफी मागणार आहात. ५० ठिकाणी माफी मागणार? गोंदियापासून, पुण्यापासून बीडपर्यंत तुम्ही माफी मागणार आहात का? कशासाठी माफी मागता, असा टोलाही भुजबळांनी लगावला.
छगन भुजबळ पुढे म्हटले की, येवल्यात जी सभा झाली त्या सभेचे आयोजन करणारे 2020 साली पक्षातून बडतर्फ केले गेलेले होते. पक्षाच्या विरोधात काम करणारे त्या दिवशी पवारांच्या सोबत दिसले. मी राष्ट्रवादी पक्षात आलो तेव्हा मी आमदार होतो, महापौरही झालो होतो. राष्ट्रवादीत आल्यानंतर मी तेलगीला पकडले. पण माझ्यावरच बालंट आले. तेव्हा साहेबांनी मला मंत्रिपद सोडायला सांगितले. तेलगी प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली आणि आरोपपत्र दाखल केले. त्या आरोपपत्रात माझे नाव नव्हते. त्यावेळी केंद्रात भाजपाचे सरकार होते. याचा अर्थ माझे मंत्रिपद काही कारण नसताना गेले होते. 2004 साली साहेबांनी मला जुन्नरहून निवडणूक लढविण्यास सांगितले. मात्र येवलेकरांचा आग्रह पाहून मी स्वतः येवल्यातून निवडणूक लढवीन, असे साहेबांना सांगितले. साहेबांनी मला येवला मतदारसंघ दिला नाही. तो मी मागून घेतला होता. बारामतीनंतर येवल्याचा विकास झाला आहे, असे साहेब म्हणायचे आणि काल साहेब म्हणाले की, मी चुकीचा उमेदवार दिला. ते येवल्यात का आले? असे किती ठिकाणी माफी मागत हिंडणार आहात? 50 ठिकाणी जाऊन माफी मागणार का? वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील सभा रद्द केली. इतर ठिकाणच्या सभा रद्द केल्या. फक्त येवल्यात सभा घेतली. मी कोणती चूक केली आहे? जे घडले ते तुमच्याच घरात झाले आहे ना? ही मंडळी का गेली? त्याचा विचार करायला हवा. केंद्रात कोणत्याही नेत्याशी चर्चा करायची तर प्रफुल्ल पटेल यांना पाठविले जायचे. तेच प्रफुल्ल पटेल साथ का सोडून गेले? साहेबांना वाटते की, मी हे सर्व घडवून आणले. ते चुकीचे आहे. मी कशातच नव्हतो.
ते पुढे म्हणाले की, 2014 साली साहेबांनी भाजपाला सांगितले होते की, तुम्ही शिवसेनेला सोडले तर मी काँग्रेसला सोडेन. तसेच घडले. भाजपाने शिवसेनेशी युती तोडली आणि साहेबांनी काँग्रेसशी साथ सोडली. निवडणुका झाल्यावर भाजपाला बाहेरून पाठिंबा देऊ, असे जाहीरही केले. त्यावेळी ज्या बैठकींमध्ये झाल्या होत्या त्या बैठका प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हेच असायचे. 2017 साली जेव्हा पुन्हा प्रसंग आला तेव्हा तर मी जेलमध्ये होतो. त्यावेळी उद्योगपतीकडे बैठका झाल्या आणि साहेबांनी तेव्हाही सांगितले की, शिवसेनेला बाहेर काढा. 2019 च्या निवडणुकीवेळी साहेब दिल्लीला गेले आणि मोदींशी सर्व ठरवून आले. निवडणुकीनंतर भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करायचे असे ठरले. तेव्हाच अडीच-अडीच वर्षे सरकारबाबत उद्धव ठाकरेंशी वाद होऊन भाजपाने शिवसेनेला सोडले. त्यावेळीही प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हेच बैठकींना उपस्थित असायचे. या सर्वांत मला दोष देऊन काय उपयोग? 2019 ला भाजपाला पाठिंबा द्यावा, असे राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचे पत्र शरद पवारांना देण्यात आले. या पत्रावर रोहित पवार, जयंत पाटील यांच्याही सह्या आहेत. ही बाब साहेबांना सांगण्याचे काम माझ्यावर सोपविले होते. म्हणूनच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अलिकडे पुन्हा बैठक झाली आणि साहेबांच्या घरी ठरले की, 15 दिवसांनंतर ते राजीनामा देतील. हे सर्व आधी ठरले होते. मला याची काहीच माहिती नव्हती.
साहेबांनी राजीनामा दिल्यावर मीच त्यांना राजीनामा मागे घ्या, असे त्यांच्या घरी जाऊन सांगितले. त्यानंतर तीन दिवसांनी साहेबांनी माघार घेतली. साहेबांनी मग सुनिल तटकरे यांच्याकडून सर्वांना निरोप पाठविला की, उद्या सुप्रिया सुळे या राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केल्या जाणार आहेत. तेव्हा तुम्ही सर्वांनी हजर रहा. मी प्रफुल्ल पटेल यांना हा निरोप सांगितला. तेव्हा ते म्हणाले की, मी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष झाल्या तर मी तीन नंबरला जातो. मला हे मान्य नाही. मी राजीनामा देतो. तेव्हा मीच त्यांना समजाविले. शिंदे शिवसेना सोडून गेले तेव्हाही भाजपाशी चर्चा सुरू होती. भाजपाबरोबर सरकार स्थापन करायचे तर किती मंत्रिपदे पाहिजेत हे साहेबांनी स्वतः लिहून दिले होते. हे सर्व घेऊन जयंत पाटील, अजित पवार चर्चेला निघाले. त्यापूर्वी आम्ही जात आहोत, असे सांगायला जयंत पाटील साहेबांच्या घरी गेले तेव्हा साहेब म्हणाले, जायचे नाही. हे असे सतत घडत होते. प्रत्येक चर्चेला प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि नंतर जयंत पाटील असायचे. मी यात कुठेही नसताना माझ्यावर राग कशासाठी आहे? असा सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे.