(नवी दिल्ली)
फसवणुकीचे नवनवीन फंडे हॅकर वापरत असतात. आता ऑनलाईन खेळल्या जाणा-या २८ गेम्सच्या माध्यमातून युजर्सची आर्थिक माहिती अर्थात डेटा हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. रॉब्लॉक्स, फिफा, पबजी आणि माईनक्राफ्टसारख्या लोकप्रिय गेम्सचा या २८ गेम्समध्ये समावेश आहे. या गेम्सच्या माध्यमातून मालवेअरद्वारे आर्थिक डेटा हॅक करण्यात आला आहे.
जुन-जुलै २०२१ काळात सुमारे ९२ हजार फाईल्सद्वारे ३ लाख ८४ हजार युजर्सचा डेटा हॅक करण्यात आला आहे. गेम डाउनलोड करताना अनावश्यक प्रोग्राम्स आणि अॅडवेअरमध्ये संशोधकांना ट्रोजन स्पायस देखील आढळले आहे. जे कीबोर्डवर टाईप केलेला कोणताही डेटा ट्रॅक करण्यास आणि स्क्रीनशॉट घेण्यास सक्षम असे मालवेअर आहे.
कॅस्परस्की संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या गेम्सच्या माध्यमातून रेडलाइन मालवेअर पसरवण्यात आले आहे. रेडलाइन हे पासवर्ड चोरणारे सॉफ्टवेअर आहे, जे व्यक्तीच्या डिव्हाइसमधून पासवर्ड, सेव्ह केलेले बँक कार्ड तपशील, क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स सेवांसाठी क्रेडेन्शियल्स यांसारखा संवेदनशील डेटाची चोरी करते. सायबर गुन्हेगार गेम खेळणा-या युजर्सवर हल्ला करण्यासाठी, त्यांचा क्रेडिट कार्ड डेटा आणि अगदी गेम खाती चोरण्यासाठी अधिकाधिक नवीन युक्त्या आणि साधने तयार करत आहेत, ज्यात महागड्या स्किन असू शकतात. ज्या नंतर विकल्या जातात.