(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख शहरातील चर्मालय स्मशानभूमीत १४ लाखाचा निधी खर्च करून वुड फायर शवदाहिनी बसवण्यात आली आहे. काम पूर्ण होवून १ वर्षाचा कालावधी होतो ना होतो तोपर्यंत वापरापूर्वीच या दाहिनीची मोडमोड झाल्याचे चित्र आहे. याकडे नगर पंचायतीने लक्ष देणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा या दाहिनीचा खर्च पाण्यात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मृतदेहाला अग्नि देण्यासाठी लाकडांची गरज असते. भविष्याचा विचार करून देवरूख येथील चर्मालय स्मशानभूमीत एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १४ लाखाचा निधी खर्च करून वुड फायर शवदाहिनी बसवण्यात आली आहे. १७ जून २०२३ रोजी या शवदाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. अल्फा इक्विपमेंट मकारपूर बडोदा कंपनीने शवदाहिनी बसवली आहे. १ वर्षाचा कालावधी लोटत आला तरी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. लाखो रुपयांची ही यंत्रणा नादुरुस्त असल्याने वापरापूर्वीच मोडतोड होवू लागल्याचे दिसत आहे. या सारख्या शवदाहिनीचा वापर करण्याकडे अजून तशी मानसिकता तयार झालेली नाही. त्यामुळे परंपरागत असलेल्या पध्दतीच वापरल्या जात आहेत.
वास्तविक नगर पंचायतने ही शवदाहिनी का बसवण्यात आली आहे, महत्व, फायदे हे नागरिकांना समजावून सांगणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये जनजागृती झाली तर नागरिक शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार होणार आहेत. अन्यथा १४ लाखाचा निधी पाण्यात जाणार आहे. शवदाहिनी उभारून चालणार नाही तर परंपरागत असलेल्या पद्धती जरा बाजूला सारून आता नव्यानं निर्माण केलेल्या यांत्रिक पद्धतीने कार्यान्वित राहणे तितकेच महत्वाचे आहे. तशी जनजागृती होणे आवश्यक आहे. मात्र नगर पंचायत कडून कोणतीच हालचाल होताना दिसत नाही.
सोयी-सुविधांची वानवा
चर्मालय स्मशानभूमीत सोयीसुविधांची वानवा आहे. २ ते ३ वर्षापूर्वी शहरातील सर्वच स्मशानभूमीची डागडुजी करण्यासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला होता. या माध्यमातून नवीड शेड उभारणे, विद्युत पुरवठा, कमान, बागबगीचा करणे, पाण्यासाठी टाकी बसवणे यांचा समावेश होता. मात्र सध्या चर्मालय स्मशानभूमीतील कमानीचे काम अर्धवट आहे. पाण्याची टाकी बसवलेली नाही, उघडी विहीर धोक्याची घंटा वाजवत आहे. बागबगीचा करण्यात आलेला नाही. वीज पुरवठ्यासाठी नागरिकांनी नगर पंचायतीकडे वारंवार मागणी केली. यानंतर वीज पुरवठा करण्यात आला.
प्रकल्पाचा खेळखंडोबा
देवरुख मधील या वूड फायर दाहिनीसाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १४ लाखाचा निधी देण्यात आला. त्यामागे शासनाचा चांगला उद्देश होता. परंतु अलीकडच्या काळात होणाऱ्या विविध प्रकल्प उभारणी प्रमाणेच देवरुख मधील या प्रकल्पाच्या उभारणीत खेळखंडोबा झाला. त्यामुळे या दाहिनीच्या कामात नेमक्या कोणत्या उणीवा राहिल्या. काम निकट झाले का, कोण दोषी आहेत? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जनतेला हवी आहेत.