(रत्नागिरी)
वडिलांच्या मित्राची ओळख सांगून त्यांच्या नावे तब्बल १० लाख रुपये मागवून घेत रत्नागिरीतील व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणुकीची घटना बुधवारी (१६ फेब्रुवारी) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी मुकेश गुंदेचा (रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या वडिलांचे मित्र हसमुख जैन (रा. दापोली) यांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रकाश धारीवाल (रा. पुणे) यांना १० लाखांची गरज असल्याने दिल्ली येथे दीपक नामक व्यक्तीकडे पैसे मागवून घेतले.
त्याप्रमाणे मुकेश गुंदेचा यांनी पैसे पाठवून दिले. काही कालावधीनंतर हे सर्व पैसे राजापूर येथील नवीन धारीवाल हे फिर्यादींना परत आणून देणार असे ठरले होते. परंतु, ठरलेल्या मुदतीत पैसे न मिळाल्याने वडिलांचे मित्र हसमुख जैन यांनी प्रकाश धारीवाल यांना दुसऱ्या मोबाइलवर फोन केला. त्यावेळी त्यांनी आपण पैसे मागितलेच नसल्याचे हसमुख जैन यांना सांगितले. त्यामुळे प्रकाश धारीवाल व नवीन धारीवाल यांच्या नावाचा वापर करून संशयितांनी १० लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी दीपक व अन्य दोन अज्ञात (सर्व रा. चांदणी चौक, दिल्ली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.