(बंगळुरू)
आयपीएलचा १५वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात झाला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात लखनौने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयासह लखनौचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आला आहे.
आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत चांगलाच रंगला होता. पण या सामन्यात दिनेश कार्तिककडून एक मोठी चूक घडली आणि त्याचा फटका आरसीबीला बसल्याचे पाहायला मिळाले. कार्तिकने जर एक चेंडू व्यवस्थित पकडला असता तर आरसीबीला या सामन्यात विजय मिळवता आला असता. शेवटच्या षटकात लखनौला विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. तर शेवटच्या चेंडूवर एक धाव हवी होती. अशा परिस्थितीत लखनौने थरारक पद्धतीने विजय मिळवला.
आरसीबीच्या संघाने विराट कोहली, फॅफ ड्यु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २१२ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर आरसीबीने लखनौला एकामागून एक तीन धक्के दिले होते. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने लखनौचा सलामीवीर काइल मेयर्सला शून्यावर बाद केले. त्यानंतर वेन पार्नेलने एकाच षटकात दीपक हुडा आणि कृणाल पांड्या या दोघांनाही बाद केले. त्यामुळे त्यांची ३ बाद २३ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर मार्कसन स्टॉयिनस व निकोलस पुरन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने या सामन्यात आपले आव्हान जीवंत ठेवले. पण फटकेबाजी करणारा पुरन बाद झाला. आयुष बदोनी लखनौला सामना जिंकवून देत असताना तो हिट विकेट झाला. जयदेव उनाडकट उगाच मोठा फटका मारायला गेला आणि बाद झाला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर लखनौला एकच धाव हवी होती.
जर आरसीबीने हा चेंडू निर्धाव टाकला असता तर सुपर ओव्हरमध्ये सामना गेला असता आणि त्यांना विजयाची आशा निर्माण झाली होती. हर्षल पटेल गोलंदाजी करत होता. अवेश खान पहिलाच चेंडू खेळणार होता. त्यावेळी हर्षलने अचूक चेंडू टाकला आणि त्यावर अवेश खानला फटका मारता आला नाही, त्यामुळे हा चेंडू दिनेश कार्तिकच्या हातामध्ये गेला. हा चेंडू व्यवस्थित पकडून जर कार्तिकने फेकला असता तर एकही धाव होऊ शकली नसती. पण कार्तिकला यावेळी हा चेंडू नीट पकडताच आला नाही आणि त्याच्या हातून चेंडूबरोबर सामनाही निसटला.
तत्पूर्वी विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांच्या तुफानी खेळीपुढे लखनौची दाणादाण उडाली. आरसीबीने निर्धारित २० षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी अर्धशतकी खेळी केली. लखनौकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शतकी भागिदारी केली. लखनौला विजयासाठी २१३ धावांची गरज होती.
लखनौविरोधात विराट कोहलीने झंझावाती खेळी करत अर्धशतक झळकावले. नाणेफेक गमावल्यानंतर विराट कोहलीने फाफ डु प्लेसिससोबत पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. विराट कोहलीने ४४ चेंडूत ६६ धावांचा पाऊस पाडला. विराट कोहलीने फाफसोबत ९६ धावांची सलामीची भागिदारी केली. त्यानंतर प्लेसिस आणि मॅक्सवेलने धावांचा पाऊस पाडला. पण त्यांची ही खेळी व्यर्थ ठरली.
या सामन्यात आरसीबीकडून गोलंदाज अधिक महागडे ठरले. तर मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २२ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय वेन पारनेलने ४ षटकांत ४१ धावा देत ३ बळी घेतले. दुसरीकडे कर्ण शर्माने ३ षटकांत ४८ धावा देत एक विकेट मिळवला. उर्वरित गोलंदाजांमध्ये हर्षल पटेलने ४ षटकांत ४८ धावा देत १ बळी घेतला.