(मुंबई)
विनोदी अभिनेता म्हणून राजपाल यादवने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र सगळ्यांचा लाडका असा हा विनोदी अभिनेता राजपाल हा अडचणीत आला आहे. तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली राजपालला नोटीस बजावण्यात आली आहे. इंदोर पोलिसानी राजपाल यादवला ही नोटीस बजावली आहे. येत्या १५ दिवसात त्याला पोलिसांसमोर हजर राहावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
इंदोरमधील बिल्डर सुरिंदर सिंग यांनी राजपाल यादवविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. बिल्डरने असे सांगितले आहे की, राजपाल यादवने माझ्या मुलाला सिनेसृष्टीत पुढे जाण्यास मदत करण्यासाठी २० लाख रुपये घेतले होते. मात्र आतापर्यंत राजपाल यादवने माझ्या मुलाला काही काम मिळवून दिलेले नाही. सिनेसृष्टीत येण्यासाठी काही मदतही केलेली नाही. त्याला पैसे परत करण्यास सांगितल्यावर तो गायब झाला. याप्रकरणी राजपाल आपला फोन उचलत नसून पैसेही परत करत नाही, असा आरोप त्या बिल्डरने केला आहे. शेवटी त्या बिल्डरने इंदोरमधील तुकोगंज पोलिसांकडे तक्रार केली आहे.
याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी राजपालला येत्या १५ दिवसांमध्ये पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे • आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करणारे उपनिरीक्षक लालन मिश्रा म्हणाले की, सुरिंदर सिंग यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणाची तक्रार दिली होती. याच • आधारे राजपाल यादवला नोटीस बजावण्यात आली असून येत्या १५ दिवसात उत्तर द्यावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान राजपाल यादव हा काही दिवसांपूर्वी ‘भूल भुलैया 2′ या चित्रपटात छोटा पंडितच्या भूमिकेत दिसला होता. तसेच तो ‘अर्ध’ चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसला होता.