(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील होळी समुद्रकिनारी दिनांक 18 ऑगस्ट 23रोजी सायंकाळी व्हेल प्रजातीचा एक जवळपास सहा ते सात फुटी मासा किनाऱ्यावर आढळून आला होता. सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निदर्शनास आल्यानंतर काही स्थानिकांच्या मदतीने माशाला पाण्यात लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार प्रयत्न करूनही तो खोल पाण्यात जात नसल्याने पत्रकार राजन लाड यांना फोनवरून माहिती देत काही लोकांना समुद्रकिनारी येता येईल का अशी विचारणा केली. पत्रकार राजन लाड यांनी तात्काळ व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तशा आशयाचा मेसेज टाकत तसेच काही जणांना फोन करत तात्काळ होळी समुद्रकिनारी यायचे आवाहन केले .
या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आपदाचे प्रशिक्षण घेतलेले पंगेरे येथील आशिष पाटील, पिंट्या शिरवडकर, रुपेश कोठारकर, मनीष करगुटकर, समीर पावसकर, महेश उर्फ बाबा मांजरेकर , गणेश बाणे, राजू गिरी आदींसह दहा मिनिटात होळी गावासह परिसरातील जवळपास 20 ते 25 युवक तात्काळ होळी समुद्रकिनारी गोळा झाले. या सर्वांनी जवळपास सात ते आठ वेळा या माशाला खोल पाण्यात लोटण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येक वेळी तो पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येऊन धडकत होता. नुकतीच अमावस्या झाली होती त्यातच अरबी समुद्र खवळलेला होता उंच उंच लाटा सुद्धा येत होत्या अशाही परिस्थितीत उपस्थित आणि प्रयत्नांची पराकाष्टा केली. दरम्यानच्या काळात फिशरीज विभागालाही याची माहिती देण्यात आली फिशरीज विभागाने राजापूर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही तात्काळ याची खबर दिली.
जवळपास दोन ते अडीच तास प्रयत्न केल्यानंतर ही तो मासा खोल पाण्यात जात नसल्याने ती मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वनविभागाचे रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार,वनपाल राजापूर सदानंद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम कुंभार वनरक्षक, दिपक म्हादये, दिपक चव्हाण, प्रथमेश म्हादये, निलेश म्हादये, विजय म्हादये, वैभव कुवेस्कर, रुपेश मोहिते , सागवेकर आदीसह फिशरीज विभागाचे तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
भर पावसात त्यांनीही त्या माशाला पाण्यात सोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र या सर्वांच्या प्रयत्नाला यश आले नाही आणि पहाटे तीनच्या सुमारास तो मासा मृत झाला. आज सकाळी त्या माशाचे शवविच्छेदन केल्यानंतर समुद्रकिनारी त्याला दफन करण्यात आले. भर पावसात आणि लाटांच्या मारत त्या माशाला वाचविण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याने अनेकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.