(मुंबई)
होडीमधील खणांमध्ये मासे काढण्यासाठी उतरलेल्या दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मुंबई येथील भाऊच्या धक्क्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बोटीवरील अन्य तिघांची प्रकृती स्थिर आहे.
श्रीनिवास यादव (वय, ३५) आणि नागा डॉन संजय (वय, २७) असे मृत्यू झालेल्या मच्छीमारांची नावे आहेत. नागा डॉन संजयच्या मालकीची अंजनी पुत्र नावाची बोट मंगळवारी पहाटे दोन वाजता न्यू फिश जेटी येथे गेली. दरम्यान, सकाळी ११ वाजताच्या सुमारास श्रीनिवास खणांमधील मासे काढण्यासाठी नौकेत उतरला. परंतु, त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो बेशुद्ध पडला. यामुळे नागा डॉन संजय आणि सुरेश मेकला (वय, २८) हे दोघेही त्याला बाहेर काढण्यासाठी आत उतरले. मात्र, हे तिघेही बेशुद्ध होऊन पडले. या तिघांना ताबडतोब जे.जे रुग्णालयात दाखल नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी श्रीनिवास आणि संजयला मृत घोषित केले. तर, सुरेशला अतिदक्षता विभागात दाखल केले. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
नौकेमध्ये काही खणांमध्ये मासे आणि बर्फ होते. मात्र, मासे असलेल्या खणांमध्ये पाझरणाऱ्या पाण्याचा निचरा झाला नाही. यामुळे पाण्यापासून विषारी वायू तयार झाला. यामुळे नौकेवरील सहापैकी दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून अपघाती मृत्युची नोंद करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मृत व्यक्ती मूळचे आंध्र प्रदेश येथील आहेत.