(मुंबई)
महाराष्ट्र विधीमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आहेत, राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी २५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता पुन्हा सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये राजेश पाटील, भाग्याश्री बानायत, दिपक सिंगला, अश्विन मदगल, डॉ. इंदुराणी जाखड आणि अजय गुल्हाने आदि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई सिडकोला नवे व्यवस्थापकीय संचालक मिळाले आहेत. तर पुणे आणि नाशिकला नवे आयुक्त मिळाले आहेत. त्याशिवाय नागपूरलाही नवे आयुक्त दिले आहेत. आतापर्यंत या पदांवर प्रभारी अधिकारी काम करत होते.
खालील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या:
१. राजेश पाटील – राज्य सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथून नवी मुंबई सिडको सह व्यवस्थापकीय संचालपदी बदली झाली आहे.
२. अश्विन ए मुदगल – नवी मुंबई सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावरुन त्यांची मुंबईतील एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.
३. डॉ. इंदुराणी जाखड – MAVIM च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
४. दीपक सिंगला यांची अतिरिक्त आयुक्त, PMRDA पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५. भाग्यश्री बानायत – नाशिक येथे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
६. अजय अण्णासाहेब गुल्हाने – अजय गुल्हाने यांच्यावर नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
राज्य सरकारने याच महिन्यात ३० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्याशिवाय काही अधिकाऱ्यांची पदोन्नतीही करण्यात आली होती. यामध्ये विश्वास नांगरे पाटील, सदानंद दाते आदींचा समावेश होता.