(रत्नागिरी)
मुंबईतील वाशी बाजार समितीच्या एपीएमसी घाऊक फळबाजारात कोकणातून जाणार्या आंब्याची आवक वाढू लागली आहे. शुक्रवारी (ता. २१) वाशीमध्ये ५३ हजार पेटी दाखल झाली आहे. त्यामुळे हापूसचा बाजारभाव पाच डझनाच्या पेटीमागे हजार रुपयांनी खाली आला आहे; परंतु अजुनही रत्नागिरी जिल्ह्यातील काही बागायतदारांकडे म्हणावा तसा आंबा मिळत नसल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
हापूसचे दर आता पेटीमागे १५०० ते ४ हजार रुपयांवर आले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत १० हजार ते २४ हजार पेट्या हापूस आंब्याची आवक झाली. १ ते १६ एप्रिलदरम्यान २४ ते २८ हजार पेट्या अशी सरासरी आवक होती. १८ एप्रिलपासून मात्र हापूसची आवक दुपटीने वाढली. सलग तीन दिवस ४४ हजार ३३३ ते ५१ हजार पेट्या हापूस आंबा आल्यामुळे दोन ते पाच डझनांच्या पेटीमागे १ हजार रुपयांनी दर उतरले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हापूसची मुबलक आवक होण्याची शक्यता असल्याने दर आवाक्यात येणार असून , सर्वसामान्यांना हापूसची चव चाखता येईल.
फेब्रुवारीत हापूसचे दर पेटीला ७५०० ते ८००० रुपये एवढे होते; ते मार्चमध्ये ६००० ते ५५०० हजार रुपयांपर्यंत आले. १६ एप्रिलपर्यंत १५०० ते ५५०० रुपये असलेले दर १८ एप्रिलपासून आवक वाढल्याने पेटीमागे १ हजार रुपयांनी कमी आले आहेत. एप्रिल अखेर हापूसचे दर १५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यापार्यांनी वर्तवली आहे.
मे मध्ये दररोज ८० हजार ते १ लाख पेट्या हापूसची आवक होण्याची शक्यता आहे . सध्या एपीएमसीमध्ये आलेला ५० टक्के हापूस निर्यात होतो आणि उरलेल्या मालाची घाऊक बाजारात विक्री होते. १ ते २० एप्रिलदरम्यान ४ लाख २० हजार ५३ पेट्या हापूस आंबा मुंबई एपीएमसीत आला. अवकाळी पावसामुळे हापूस आंब्यावर तपकिरी रंगाचे डाग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजारात डागी मालाचा कमी मोबदला मिळत असल्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.