(मुंबई)
हक्कभंग होण्यासारखं विधान मी केलेलं नाही; माझं विधान एका विशिष्ट गटापुरतं आहे. मी विधान मंडळाचा अपमान केलेला नाही, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हक्कभंगाची नोटीस मिळाली तेव्हा मी मुंबईत नव्हतो. त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही. सणामुळे दोन दिवस विधीमंडळालाही सुट्ट्या होत्या. आता हक्कभंगासंदर्भात माझ्या विधीमंडळातील सहकारी, अंबादास दानवे, अनिल परब, भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करुन त्यासंदर्भात काय प्रक्रिया असते ते माहिती करुन घेऊन मी नोटीसीला उत्तर देईन, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीसीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ असं म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचे प्रकरण केंद्रांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संजय राऊतांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता असतानाच याबाबत त्यांना विचारले असता, संजय राऊतांनी त्यांची सावध भूमिका स्पष्ट केली.
“पण मी पुन्हा सांगतो, विधीमंडळाचा अपमान होईल, किंवा हक्कभंग होईल असं कोणतही विधान मी केलेलं नाही. एका विशिष्ट गटापुरतचं माझं विधान मर्यादित आहे. त्या गटासंदर्भात मी जो शब्द वापरला चोरमंडळ तो शब्द योग्यच आहे आणि हे आख्खा महाराष्ट्र म्हणतो. व्यापीठावरुन त्यांच्याबद्दल बोललं जातयं. त्यामुळे संपूर्ण विधीमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या संपू्र्ण सभागृहाला अशा प्रकारचं विधान करण हे कधीच शक्य नाही.” असही त्यांनी ठामपणे सांगितल आहे.
या राज्याची, देशाची परिस्थिती अशी आहे, जर तुम्ही अन्यायाविरुध्द आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. त्यांनी बेकायदेशीरपणे नाव आणि चिन्ह काढून घेतलं. लालू यादव यांची चौकशी होते, मनीष सिसोदियांना अटक होते. मग, ज्यांनी अख्खा देश लुटला त्या अदानीला नोटीस तरी पाठवली का ? आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही आणि जनता पूर्णपणे शुद्धीत आहोत. भांग पिऊन सत्तेवर कोण आलंय हे सिद्ध झालंय, असे ते पुढे म्हणाले.