भगवान रामावर श्रद्धा असलेल्या सर्व भक्तांसाठी महत्वाची न्यूज आहे. भगवान राम भक्तांसाठी आयआरसीटीसीकडून एक खास विशेष ऑफर दिली जात आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीद्वारे २१ जून रोजी पहिली भारत गौरव पर्यटक ट्रेन चालवली जाणार आहे. या दरम्यान यात्रेकरूंना नेपाळमधील जनकपूरलाही भेट देण्यास मिळणार आहे. तमाम हिंदू बांधवाना आता भगवान रामाशी संबंधित ठिकाणी या योजनेमुळे भेट देता येणार आहे.
स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ओळखल्या गेलेल्या रामायण सर्किटवर भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चालवली जात आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रवासात रामाच्या जीवनाशी संबंधित असणाऱ्या प्रमुख ठिकाणांचा समावेश असेल.
यामध्ये नेपाळमधील जनकपूर येथील राम जानकी मंदिराचा समावेश आहे.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचा १८ दिवसांचा प्रवास असणार
भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचा प्रवास १८ दिवसांचा असेल, ज्याचे पहिले स्थळ भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत असेल.
अयोध्येत पर्यटक रामजन्मभूमी मंदिर आणि हनुमान मंदिराला भेट देतील आणि भगवान रामाचा धाकटा भाऊ भरत यांच्या नंदीग्राम मंदिरालाही भेट देतील.
अयोध्येनंतर ही ट्रेन बिहारमधील बक्सर येथे थांबेल.
यानंतर ट्रेन सीतामढीला सीताजींच्या जन्मस्थानाच्या दर्शनासाठी जाईल आणि प्रवासी रस्त्याने नेपाळमधील जनकपूरला जातील.
प्रवासी जनकपूरमधील हॉटेलमध्ये रात्रभर मुक्काम करतील आणि तेथील प्रसिद्ध राम-जानकी मंदिराला भेट देतील.
सीतामढीनंतर ट्रेन वाराणसीला जाईल.
याशिवाय ही गाडी नाशिक, किष्किंधा हंपी आणि रामेश्वरम इत्यादी ठिकाणीही जाणार आहे.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा
भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.
या ट्रेनला एसी ३ क्लासचे डबे असतील. याशिवाय आधुनिक किचन कार असतील, ज्यातून प्रवाशांना स्वादिष्ट शाकाहारी जेवण दिले जाईल.
अन्न व खाद्यपदार्थ सर्व प्रवाशांच्या बर्थपर्यंत पोहोचवली जाईल. एवढेच नाही तर, प्रवाशांच्या मनोरंजनासाठी आणि माहितीसाठी इन्फोटेनमेंट सिस्टीमही बसवण्यात आली आहे. ट्रेनमध्ये सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेतली जाणार आहे.
प्रवास भाडे हप्त्यांमध्ये देखील भरण्याची मुभा
भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमध्ये १८ दिवसांच्या प्रवासासाठी तुम्ही प्रति व्यक्ती ६२,३७० रुपये भाडे निश्चित केले आहे.
त्याचे तिकीट बुकिंग यूपीय पेमेंटद्वारे देखील करता येते.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रवासी हे भाडे सुलभ हप्त्यांमध्येही भरू शकतात.
प्रवासी भाडे ३, ६, ९, १२, १८ आणि २४ महिन्यांच्या हप्त्यांमध्ये भरू शकतात.
हप्त्यांमध्ये पेमेंट करण्याची सुविधा फक्त डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे बुकिंग केल्यावर उपलब्ध असेल.
प्रवाशांना फेस मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझर दिले जातील. या प्रवासाच्या बुकिंगसाठी, 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील प्रत्येक प्रवाशाला कोविड लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असेल. याचे बुकिंग IRCTC वेबसाइटवर केले जाऊ शकते. ट्रेनमध्ये पर्यटकांना शाकाहारी जेवण दिले जाईल. यासोबतच इन्फोटेनमेंट सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षा रक्षक आदी सुविधा असणार आहेत. या ट्रेनला 14 AC III श्रेणीचे डबे असतील. यातील दहा डबे प्रवाशांसाठी असतील.