(अहमदनगर)
अहमदनगर जिल्ह्यात फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केले होते. त्यांच्या चौकशीतून यामागे मोठे रॅकेट असल्याचे निष्पन झाले आहे. तसेच विशेष म्हणजे या प्रकरणात सैराट चित्रपटातील प्रिन्स म्हणजेच सुरज पवार याचाही सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. याची कबुली अटकेतील आरोपींनी दिल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलीस लवकरच सूरज पवार याला अटक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक केली आहे तसेच संशितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय क्षिरसागर, आकाश शिंदे, ओमकार तरटे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
मंत्रालायात नोकरीला लावतो असे अमिष दाखवून पाच लाख रुपयांची संशयितांकडून मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि तत्काळ आरोपींना अटक केली होती. या तीन आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात अभिनेता सुरज पवार याचाही सहभाग असल्याची माहिती त्यांनी दिली. या कारणामुळे आता सुरज पवारलाही पोलिस अटक करणार आहेत असं बोललं जात आहे.
आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी या जागा भरायच्या आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर येईल तेव्हा तीन लाख द्यावे लागतील असं त्याला फोनवर सांगण्यात आलं होतं. तरुण बेरोजगार असल्याने त्यांनी लगेच होकार दिला.
४ सप्टेंबर रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडीच करार झाला होता. पहिल्या वेळी वाघडकर यांनी दोन लाख दिले. तर उरलेली तीन लाख रक्कम नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते. दोन तीन दिवसांनंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथून घेऊन जा, असं त्यांना सांगण्यात आलं. पण त्यांना संशय आल्याने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के अन् दस्तावेज तयार करणे या कलमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.