(चिपळूण /इक्बाल जमादार )
कोकणातील सांस्कृतिक चळवळीचा वारसा जोपासणाऱ्या येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ स्वातंत्रदिना निमित्ताने बाजूला झाले असुन रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या हस्ते सांस्कृतिक केंद्राचे उदघाटन पार पडले. तब्बल सतरा वर्षे तांत्रिक अडचणीत अडकून पडलेले हे सांस्कृतिक केंद्र पुन्हा नव्या जोमाने चिपळूणवासियांसाठी खुले झाले आहे. यामुळे चिपळूणवासियांचे कित्येक वर्षाचे स्वप्न साकार झाले असून चिपळूण मधील सांस्कृतिक चळवळीला देखील पुन्हा एकदा उभारी मिळणार आहे.
महापुरात खराब झालेले रंगमंच, खुर्च्या, दरवाजे, इंटेरियर, विद्युत व्यवस्था, खोल्या तसेच रंगकाम अशी सर्व कामांची दुरुस्ती करुन काल हे सांस्कृत्रिक केंद्र सुरु झाले आहे. पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्यामुळे आणि प्रशासकन प्रसाद शिंगटे यांच्या पाठपुराव्यामुळे चिपळूण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पूर्णत्वास गेले आहे. चांगल्या कामांचे समर्थन करणारे लोक चिपळूणमध्ये असल्याचे मनापासून कौतुक यावेळी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी केले. चिपळूणवासियांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचा पालकमंत्री म्हणून मला समाधान असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सांस्कृतिक केंद्राचा १७ वर्षानी रखडलेला प्रश्न सोडवण्यासाठी मला पालकमंत्री व्हावे लागले हे माझें भाग्य असल्याचे मी समजतो. यापुढे चिपळूणच्या विकासासाठी एकही रुपया निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द पालकमंत्री यांनी चिपळूणवासियांना दिला आहे.
पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या कामाचे कौतुक केले. आपल्या सहकाऱ्यांसह येथे ठाण मांडून कामावर स्वतः लक्ष ठेवून दिलेला आदेश पूर्ण केला. एका अधिकाऱ्यांने मनावर घेतले तर ७० दिवसात कसा कायापालट केला जाईल याचे उदाहरण म्हणजे प्रसाद शिंगटे आहेत. यावेळी पालकमंत्री यांनी आपली शॉल चिपळूणचे मुख्य कार्यकरी अधिकारी प्रसाद शिंगटे यांना घालून त्यांच्या पाठीवर कौतुकांची धाप मारली.
या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत, माजी मंत्री गुहागरचे आमदार भास्कर जाधव, चिपळूणचे आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी नगराध्यक्षा सुरेखा थेराडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, युवजिल्हा प्रमुख मुन्ना देसाई, प्रांत आकाश लिगाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे, रत्नागिरी तालुका प्रमुख बांबू म्हाप, सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद, जमूरत अलजी ,चिपळूणचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, विविध पक्षाचे पदाधिकारी, महिला वर्ग, पत्रकार आणि चिपळूण मधील शेकडो रसिक प्रेक्षक उपस्थित होते.