(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जयगड येथील निसर्ग यावर्षीच्या पावसाळी सहलीत सह्याद्री कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हुबेहूब रेखाटत त्यात भरलेल्या रंगांनी सारा परिसर कॅनव्हास आणि कागदावर जणू जीवंत झाल्याची अनुभूती परिसरातील कलारसिकांना घेता आली. या निसर्ग अभ्यास सहलीत कलाकारांनी निसर्गाची शेकडो दृष्ये रेखाटली.
कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे हे चित्र-शिल्प कलामहाविद्यालय प्रतिवर्षी पावसाळी शैक्षणिक सहलीचे आयोजन करते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर निसर्गात जाऊन चित्रकलेचे प्रत्यक्ष धडे मिळावेत यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी व ऐतिहासिक स्थळांवर नेले जाते. तेथे जाऊन विद्यार्थी प्रत्यक्ष निसर्गाशी समरस होऊन ते दृश्य कागदावर उमटवितात. तेथील झाडे, डोंगर, नदी, घरे, माणसे अशी विविधांगी रेखाटने विद्यार्थी आपल्या कलेतून उमटवितात.
या वर्षी शैक्षणिक सहलीचे ठिकाण हे रत्नागिरी जिल्यातील जयगड या ठिकाणी जाणार आहे. जयगडला लाभलेल्या समुद्र खाडिमुळे जयगडच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.तेथील जयगड बंदर,किल्ला, कऱ्हाटेश मंदिर,गणपती मंदिर हि सहलीची ठिकाणे होती.पहिल्यादिवशी सकाळी धुक्यामध्ये जयगड किल्ला तसेच मंदिर आणि सागर खाडी त्यावर पडणारी सूर्याची किरणे त्यामुळे दिसणारे मनमोहक दृश्य विद्यार्थ्यांनी जलरंग, तैलरंग, पेन्सिल, खडू अशा विविध माध्यमात ७०हून अधिक चित्रे कागदावर उमटविले आहेत.
या शैक्षणिक सहली दरम्यान नाशिकचे सुप्रसिद्ध चित्रकार अशोक ढिवरे यांनी चित्र प्रात्यक्षिकाबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद सादला. मुलांच्या मनातील अगणित प्रश्नांचे निरसन केले.कलाविद्यार्थ्यांना चित्र सुधारण्यासाठी काही सूचना दिल्या. चित्रबरोबरच पेन्सिल स्केच किती महत्वाचे आहे हे पटवून सांगितले. त्याचबरोबर कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव व प्राध्यापक वर्गांनी वेगवेगळ्या माध्यमात कामे केली.
या सहलीची सर्व व्यवस्था जे एस डब्ल्यू कंपनी तर्फे करण्यात आली होती. कंपनीतर्फे मुलांसाठी राहण्याची, खाण्याची सर्व व्यवस्था अतिशय उत्तम रीतीने करण्यात आली.या कंपनीचे जे एस डब्ल्यु एनर्जी प्लांन्ट हेड पेदन्ना, जे एस डब्ल्यू सी एस आर हेड अनिल दधिच, एच आर राजीव जोशी, संपदा धोपटकर, मयूर पिंपळे व जे एस डब्ल्यू कंपनीचे कर्मचारी यांनी या सहलीसाठी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांची चित्रे बघून ते मंत्रमुग्ध झाले.
एनर्जी प्लांट हेड पेदन्ना बोलताना म्हणाले, मी स्वतः तामिळडू मधील असून मला वाटते की, या रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला सह्याद्रिच्या रांगा समुद्र या मुळे येथील सौंदर्यत खूप भर पडली आहे. आणि येथील कलाविद्यार्थी ते सौंदर्य जसे च्या तसेच आपल्या कागदावर उमटवीत आहेत. या बद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. एच आर राजीव जोशी यावेळी बोलताना म्हणाले की, आमच्या कंपनीत किंवा आमच्या क्षेत्रात कॉम्पुटर आणि टेकनिकल वर्क करणारी माणसं आहेत. त्यांचे साचेबद्ध काम असते पण कलाविद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नाहीत.त्यामुळे ते मुक्त अविष्कार करू शकतात त्यांच्या कामाची दुसरी नक्कल करणे कठीण आहे. प्रत्येक कलाकारचे असे एक स्वातंत्र्य काम आहे. हे एक प्रकारचे वैशिष्ट आहे. आणि या क्षेत्रात तुम्ही आलात हे तुमचं नशीब आहे.
सी एस आर हेड अनिल दधिच म्हणाले की, तुम्ही इथे येऊन छान चित्र निर्मिती केली जयगड येथील विविध देखावे कागदावर कुंचल्यांच्या व रंगांच्या साहाय्याने उतरवून येथील लोकांना मंत्रमुग्ध केलंत तसेच येथे परत आपल्या आई वडिलांना घेऊन या आणि त्यांच्यासमवेत या सगळ्याचा आनंद घ्या. तसेच विद्यार्थ्यांनी सहलीसाठी मुलांच्या व्यंगचित्रांचे जे पोस्टर तयार केले आहे तसेच आपण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे देखील भविष्यात करून घेऊ असे सांगितले.
विद्यार्थ्यांनी कामाबरोबर सहलीचा मनसोक्त आनंद लुटला अशा या विविधांगी नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात यावर्षीची शैक्षणिक सहल पार पडली. या शैक्षणिक सहली दरम्यान मुलांनी काढलेली चित्रे प्रदर्शन स्वरूपात कॅप्टन सुभाषचंद्र ठाकूर सभागृह पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी या ठिकाणी दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ ते ०२ सप्टेंबर २०२३ यादरम्यान सकाळी १० वा.ते सायं.०७ वा.या दरम्यान होणार आहे. तसेच त्यामध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रांची लिलाव स्वरूपात विक्री होणार आहे. तरी सर्व कलाप्रेमी, कलारसिक यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के आणि कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव यांनी केले आहे.