(नाशिक /प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून सेवेकर्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाकार्य करुन योगदान द्यावे, असे आवाहन सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्यांनीही टाळ्यांचा जोरदार कडकडाट करुन गुरुमाऊलींना प्रतिसाद दिला.
दिंडोरी प्रधान केंद्रात गेल्या सत्तर वर्षापासून दर गुरुवारी आणि रविवारी विनामूल्य प्रश्नोत्तरे- मार्गदर्शन आणि साप्ताहिक सत्संग समारोह सुरु आहे. सेवामार्गाच्या प्रथा-परंपरेनुसार आज (गुरुवार, 17 ऑगस्ट) परमपूज्य गुरुमाऊलींचे दिंडोरी दरबारी अमृततुल्य हितगुज झाले. श्रावण मासाचा प्रारंभ आणि दर्शनाचा योग अशी पर्वणी सेवेकर्यांनी साधली. सेवेकर्यांना संबोधित करतांना गुरुमाऊली म्हणाले की, गेल्या सात दशकांपासून दिंडोरी दरबारी दु:खी व्यक्तीला सुखी समाधानी करुन पाठविले जाते. या मार्गात नाममात्र कर्मकांड केले जाते. समाज अन् राष्ट्रहिताबरोबरच विश्वशांती नांदावी याकरिताच सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रम राबविले जातात. या धोरणानुसार सेवेकर्यांनी कर्मकांडात अडकून बसण्याऐवजी समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असा पुनरुच्चार त्यांनी केला. अधिक मासात आपण भगवान विष्णुंची सेवा केली. तर आजपासून श्रावण मासाला प्रारंभ झाल्यामुळे संपूर्ण महिनाभर भगवान शिवांच्या सेवेची संधी मिळाली आहे.भगवान शिवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे. तेव्हा सेवेकर्यांनी घरच्या घरी, सेवाकेंद्रात किंवा सामुदायिक शिवपिंडीवर मराठी किंवा संस्कृत रुद्रसूक्त, शिवमहिम्न, रामरक्षा,श्रीसूक्त, कालभैरवाष्टक पठण व जलाभिषेक करावा आणि ते पवित्र तीर्थ घरातील सर्वांनी प्राशन करावे. श्रावणाच्या सांगतेला सेवाकेंद्रात दहीभात लेपन करुन प्रसाद सर्वांना वाटावा अशी सेवा गुुरुमाऊलींनी सांगितली.
भावी पिढी सदाचारी, निर्व्यसनी व आज्ञाधारक होण्यासाठी कोवळ्या मनावर अर्थात बालकांवर सुसंस्कार होणे अत्यंत आवश्यक आहे असे विचार त्यांनी मांडले. सेवामार्गाच्या विवाह मंडळाकडे उपवर मुला-मुलींची 25 हजार स्थळे असून संबंधितांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. राज्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अनावृष्टी आहे. त्यामुळे सेवेकर्यांनी पर्जन्यसूक्ताची सेवा सुरुच ठेवावी अशी आज्ञा त्यांनी केली.
आजवर सेवामार्गाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या 4500 मुलांना रोजगार मिळाला आहे. सेवामार्गातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहीद जवानांच्या मुलांचे विवाह विनामूल्य केले जातात अशी माहिती त्यांनी दिली. आयुर्वेद, वास्तूशास्त्र, कायदेशीर सल्लागार विभाग, प्रशासकीय कामकाज विभाग, पर्यावरण प्रकृती, दुर्ग संवर्धन, देश-विदेश अभियान, याज्ञिकी, बचतगट आदी विभागावरही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या हितगुजानंतर पालखी सोहळ्यात सेवेकरी आनंदाने सहभागी झाले.