(संगमेश्वर/प्रतिनिधी)
‘आजादी का अमृत महोत्सव’ या निमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यामार्फत भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. हे शिबीर 19 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायं. 4 या वेळेत होणार आहे.
आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमधील अंगीकृत एस. एम.एस. हॉस्पिटल देवरुख मार्फत सेवा पुरवण्यात येणार आहेत. या भव्य आरोग्य मेळाव्याचे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्याहस्ते होणार आहे. तर प्रमुख उपस्थिती लोकप्रिय आमदार शेखर निकम यांची असणार आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौ. संघमित्रा फुले, संगमेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. नरेंद्र रेवंडकर, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित मोरे, संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. शेरॉन सोनावणे यांची उपस्थिती लाभणार आहे.
या मेळाव्यात रुग्णांना देण्यात येणार्या सेवा पुढीलप्रमाणे ः
1) महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती ेव अंतर्गत येणार्या शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
2) आयुष्मान योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आरोग्य मेळाव्यास येताना सोबत रेशनकार्ड व ओळखपत्र पुराव्याची मूळ प्रत (पॅनकार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखत्र) पासपोर्ट साईज फोटो घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच यादीमध्ये समाविष्ट असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड देण्यात येणार आहे.
3) हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, अस्थिरोग, मिरगी (फीट), गुप्तरोग, एच.आय.व्ही/एड्स, कान, नाक, घसा, नेत्ररोग, गर्भाशयाचे आजार, बालरोग यावर उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
4) दंतचिकित्सा व इतर सर्व आजारांचे तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
5) रक्त, सिकलसेल/थॅलेसिमिया, शुगर, ई.सी.जी. इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत.
6) लहान मुलांची संपूर्ण आरोग्य तपासणी.
7) जनरल शस्त्रक्रिया, स्त्रीरोग शस्त्रक्रिया, अस्थिरोग शस्त्रक्रिया इ. होणार आहेत.
8) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत एस.एम. एस. हॉस्पिटल देवरुख या ठिकाणी आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
या आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.