(संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
संगमेश्वर ते कोल्हापूर या राज्यमार्गावरील संगमेश्वर ते साखरपा या राज्य मार्गाचे सुमारे ३२ कोटी रुपये खर्चून रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. या मार्गावरील मोऱ्या देखील रुंद करण्यात आल्या. संगमेश्वर येथील मारुती मंदिराजवळील अवघड वळणार नव्याने उभारण्यात आलेला पूल मात्र अद्याप वाहतूकीस खूला न केल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या सुरु असणाऱ्या येथील मार्गाचा काही भाग ढासळला असल्याने तो वाहतूकीसाठी धोकादायक ठरत आहे . परिणामी येथे छोटे मोठे अपघात घडत आहेत . सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील पूल वाहतूकीसाठी खूला करुन येथे आवश्यक उपाययोजना हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
संगमेश्वर ते साखरपा हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता या राज्य मार्गाचे रूंदीकरण करावे अशी मागणी वाहनचालकांकडून सातत्याने केली जात होती. खड्ड्यांमुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक आणि कंटाळवाणा बनला होता. अखेरीस संगमेश्वर साखरपा राज्य मार्गासाठी ३२ कोटींचा निधी मंजूर झाला . मात्र प्रत्यक्षात काम सुरु होण्यास खूपच विलंब झाला . संगमेश्वर साखरपा मार्ग पुढे कोल्हापूरला जोडला गेला असल्याने या मार्गावर दिवसरात्र खूप मोठी वाहतूक सुरु असते . वाढत्या वाहतूकीच्या तुलनेत एकाचवेळी दोन वाहनांना जाण्यासाठी हा मार्ग अरुंद ठरायचा.
या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु झाल्यानंतर मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरु झाल्याने डांबरीकरणाचे काम जवळपास दोन महिने थांबवावे लागले होते . विशेष परवानगीने डांबरीकरणाचे काम सुरु झाले, याबरोबरच गतवर्षी संगमेश्वरच्या मारुती मंदिर जवळील अवघड वळणावर जूनी मोरी धोकादायक बनल्यामुळे जून अखेरीस येथे नवीन पूल उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले होते.
मारुती मंदिर येथील वळणावर सतत छोटे मोठे अपघात घडत असतांना नव्याने उभारण्यात आलेला पूल अद्याप वाहतूकीसाठी का खूला केला नाही ? असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे. या वळणावरच जून्या मार्गावरचा रस्ता अत्यंत धोकादायक पध्दतीने ढासळला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजूला उभारलेला पूल तातडीने वाहतूकीसाठी खूला करावा अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. राज्यमार्गावर वाहन चालक व पादचारी यांची गैरसोय लक्षात घेऊन त्वरित हा पूल खुला करावा अशी मागणी होत आहे.
पत्रकार रस्त्यावर उतरणार
कोल्हापूर कडे जाणाऱ्या मार्गावर पूल उभारूनही तो खुला केला जात नाही याबाबत बांधकाम विभाग अधिकारी करतात तरी काय असा संतप्त सवाल करीत पूल खुला न केल्यास संगमेश्वर तालुका पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे