टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उदय सामंत यांनी म्हटले आहे की, विरोधकांकडे टीका करण्यापलीकडे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही काम उरलेले नाही. २१ सप्टेंबर २०२१ रोजी याचा एमओयू केंद्र सरकारने केला होता. एका वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातला उभा करण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता, तरीदेखील आम्ही प्रयत्न करू, असं मी म्हटलं होतं मात्र आता तो प्रकल्प गुजरातला उभा रहात आहे.
वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा-एअरबस सी-२९५ हा प्रकल्पही गुजरातला गेला असल्याने दिवाळीनंतर पुन्हा एकदा सरकार विरुद्ध विरोधक सामने आले आहेत. टाटा एअरबस प्रकल्पांतर्गत विमानांची निर्मिती गुजरातमधील वडोदरा येथील प्लांटमध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता,पण आता गुजरातला गेल्याचा आरोप महाआघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
एका वर्षापूर्वीच जो प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय झाला आहे. विरोधकांचा हा आरोप म्हणजे शिळ्या कढीला उकळी काढण्याचा प्रकार आहे. एमओयू झाल्यानंतर मागच्या सरकारचं एकही पत्र उद्योग विभागात सापडलं नाही. सत्तेत असताना ज्यांनी या प्रोजेक्टसाठी प्रयत्न केले नाहीत, त्यांनी युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही. एका वर्षापूर्वीच गेलेला प्रकल्प आता गेला असं सांगून जनतेत संभ्रम निर्माण करण्यात अर्थ नाही,असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.