(निवोशी-गुहागर/उदय दणदणे)
परका झालो तुमच्या प्रेमासाठी….आधार हा मोठा होता पाठी…!
निष्टुर देवा काळ का झाला…केले मला पोरका रे…!
माया त्यांनी लावली अथांग रे….शोधू कुठे त्यांना देवा सांग रे…!
गुहागर तालुक्यातील निवोशी गावचे सुपुत्र मनोरंजनाचा हुकमी एक्का अशी अल्पवधीतच आपली ओळख निर्माण करणारे युवा कवी- शाहिर श्री सुशीलकुमार धुमक यांचा कला प्रवासातील पहिलं रेकॉर्डिंग गीत त्यांचे वडील स्वर्गीय- यशवंत धुमक यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी त्यांना श्रद्धांजलीपर गीताने आदरांजली वाहून आपलं पहिलं पाऊल आज रेकॉर्डिंग क्षेत्रात टाकलं आहे. आपल्या काव्य लेखणीतून हृदयस्पर्शी शब्दसुमनांची गुंफण करून आपल्या आवाजात पहिलंच असं श्रद्धांजली गीत रेकॉर्डिंग करून १४ जून २०२२ रोजी अवघ्या कलाक्षेत्रात त्याचं हे गीत प्रसिद्ध झाले आहे.
“माया त्यांनी लावली अथांग रे! …शोधू कुठे त्यांना देवा सांग रे ! …गीतातील हे बोल अनेकांना भावनिक करून जातात. कलाक्षेत्रात प्रत्येक नवख्या कवी शाहिरांना मोलाचे मार्गदर्शन लाभते असे पत्रकार, कवी, लेखक साहित्यिक सुप्रसिद्ध शाहिर शाहिद खेरटकर ( चिपळूण ) यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, हे गीत विशेष म्हणजे हृदयातून ते दुःख प्रकट झालंय त्यामुळे गळ्यातून निघालेला सूर हा सच्चा वाटतो…आवाजात त्या वेदना जाणवतात… आणि श्रोत्यांना त्या भावनाविवश करतात…अशा विविध या श्रद्धांजली गीताला उत्तम अश्या प्रतिक्रिया येत आहेत.
नुकताच या मोसमातील ७ जुलै २०२२ रोजी मास्टर दिनानाथ नाट्यगृहात शक्ती-तुराचा जंगी सामना २०२२ शाहिर उमेश पोटले आणि शाहिर सुशीलकुमार धुमक यांच्यात ही लक्षवेधी जुगलबंदी रसिकांना पाहायला मिळाली होती आणि आता या नवीन गीताने रसिकांना एक भावनिक गीत त्यांच्या सुमधुर आवाजात पाहायला मिळणार आहे.
या श्रद्धांजली गीताचे गीतकार-गायक शाहिर सुशीलकुमार धुमक हे स्वतः आहेत तर रेकॉर्डिंग आणि संगीत पंकज घाणेकर यांचे लाभले असून विजय घाणेकर, साईप्रसाद गोवळकर यांनी कोरसला साथ दिली आहे. कवी /शाहिर सुशीलकुमार धुमक यांच्या आवाजातील हे श्रद्धांजली गीत CREATIVE STUDIO (क्रिएटिव्ह स्टुडिओ) या युट्यूब चॅनेलवर ऐकायला मिळेल. लवकरच त्यांच्या लेखणीतून उमटलेली समाजप्रबोधनपर गीते त्यांच्या आवाजात रसिकांना ऐकायला मिळतील असे शाहिर सुशीलकुमार धुमक यांनी आश्वसित करून पहिल्याच रेकॉर्डिंग गीताला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले .