(संगमेश्वर)
भातशेती व्यतिरिक्त कोकणात फारसे काही होत नाही हा समज आता तरुण शेतकऱ्यांनी विविध पिके घेऊन चुकीचा असल्याचे स्पष्ट केलेय. संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे येथील प्रयोगशील युवा शेतकरी मकरंद मुळ्ये याने आपल्या शेतात वाल आणि काकडीची लागवड करुन भरघोस पीक घेतले आहे. संगमेश्वर बाजारपेठेत या शेतमालाला मोठी मागणी असल्याने या विक्रीतून त्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे असुर्डे हे गाव तसे दुर्गमच. नैसर्गिक उताराने येणारे झऱ्यांचे पाणी ही मोठी देणगी आहे असे मानून युवा शेतकरी मकरंद मुळ्ये याने स्वतःच्या जागेत भाजीपाला लागवडीचे विविध प्रयोग करायचे ठरवले. पालाभाजीची लागवड सर्वत्र होतेच मात्र शास्त्रशुध्द पध्दतीने वाल, काकडी आणि दोडक्याची लागवड मुळ्ये यांनी केली आहे. यासाठी वेलांच्या जवळ आठ फुटांवर बांबू उभे करुन त्यांना उभ्या दोन फुटांवर लांबच्यालांब दोऱ्या बांधल्या. यामुळे वाल, काकडी आणि दोडका यांचे वेल चांगलेच फोफावले. ठिबक सिंचन पध्दतीने वेलांना पाण्याची मात्रा दिल्याने पाणी लावण्यासाठी लागणारा वेळ वाचला आणि पाण्याचे योग्य नियोजनही झाले.
काही दिवसातच वाल, काकडी आणि दोडका यांचे उत्पादन सुरु झाले. दिवसाला साधारण दहा किलो काकड्या मिळू लागल्या. घाऊक बाजारात काकडीला साठ रुपये दर देखील मिळत होता. काकडीला असणारी मागणी वाढतच गेली. वालाची शेंग उंचीला जवळपास दोन फुटांपर्यंत वाढल्याने या लांब शेंगाच्या जुड्यांना मोठी मागणी होवू लागली. तालुक्यात सहसा दोडक्याचे पीक कोणी घेत नाही. मात्र वेगळी मेहनत न करता याच वेलांच्या रांगेत दोडक्याचे अतिरिक्त पीक घेण्याचे मुळ्ये यांनी ठरवले आणि या प्रयत्नांना उत्तम यश देखील मिळाले . बाजारपेठेत भाजीपाल्याला नेहमीच मोठी मागणी असते. अशातच गावठी भाजीपाला असेल तर ग्राहक त्याचे अधिक मोल देतात. बाजारपेठेसह ग्राहकांच्या मागणीचा अभ्यास करुन मकरंद मुळ्ये यांनी भाजीपाला लागवड केली असल्याने त्यांच्या मालाला नेहमीच मोठी मागणी असते.
शास्त्रोक्त पध्दतीतून पीक अधिक मिळते
आपण कोणत्याही प्रकारची लागवड करताना आधी अभ्यास करतो प्रसंगी ज्यांनी अशाप्रकारची लागवड केली आहे त्यांचे मळे पाहून येतो. शास्त्रोक्त लागवड करुन सेंद्रीय खतांचा वापर केल्यास उत्पादन अधिक मिळते हा आपला अनुभव आहे. याच्या जोडीला आपण केळी, भेंडी याचीही लागवड केलेली असल्याने शेतातील एक ना एक पीक विक्रीसाठी उपलब्ध असते. अशाप्रकारचे नियोजन केल्याने शेतमाल विक्रीतून सतत चार पैसे हाती येत असतात यामुळे आपली आर्थिक उन्नती साधता येते. हा आपला अनुभव असल्याचे मकरंद मुळ्ये यांनी सांगितले .