(मानसिक संतुलन – भाग २०)
मागच्या लेखात आपण आसनांबद्दल माहिती घेतली. मानसिक संतुलन राखण्यासाठी अनेक घटकांचा विचार करावा लागतो. मानसिकता हा घटकच इतका क्लिष्ट आहे की, भल्याभल्यांना त्याचा शोध घेता आला नाही. तिथे सामान्य माणसाची काय कथा! त्यात दुर्दैव हे की, असा हा महत्वाचा घटक असूनही त्याकडे आपले कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही. मनाचा अभ्यास करणारे एकमेव शास्त्र म्हणून योगाकडे पाहिले जाते. त्या योगाला सामान्य माणसांपर्यंत नेण्याची गरज यासाठीच आहे. मनाच्या जंजाळात सापडून सामान्य माणसाला काही कळेनासे होते. त्यातून अनेक समस्या ती ओढवून घेतो. अशावेळी त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी समाजात कोणतीही स्थिर स्वरूपातील यंत्रणा नाही. श्री योगेंद्रजींनी १०० वर्षापूर्वी याचा विचार केला. सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेऊन आसन व प्राणायाम ह्या अपरिचित शब्दांची पुनर्रचना केली. व त्यांस सुलभता आणली. आसन किंवा प्रणायामाचा असा विचार कुणी याआधी केला नव्हता. आसनांचा सरळ संबंध आपल्या दैनंदिन जीवनाशी असतो, याची कल्पना कुणी केली नव्हती. प्राणायाम मध्ये _प्राण_ आणि _श्वास_ ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे प्रथमच योग इन्स्टिट्युट ने सामान्य माणसाला लक्षात आणून दिले. प्राणायाम हे आसन स्थिर झाल्यावर करायची गोष्ट आहे. परंतू अलीकडे वेगवान हालचाली करून काही लोक प्राणायाम करतात. याचे आश्चर्य वाटते. देव सोडून कर्मकांडाला महत्व देण्यासारखे हे आहे. कुठून का होईना आपले मन कोणत्याही परिस्थितीत शांत व्हायला हवे. आपल्या मनातील आनंदाची भावना कोणत्याही बाह्य घटकांनी किंवा घटनांनी नाहीशी होता कामा नये. बाह्य तंत्रांचा उपयोग मन शांत करण्यासाठीच असतो. ते आपले लक्ष नसते. येवढे जरी लक्षात आले तरी आपली आत्मोंनतीकडे वाटचाल होते आहे असे समजावे.असे सजून सांगणारे जाणकार समाजात निर्माण होणे गरजेचे आहेत.
योगशास्त्रातील अनेक संकल्पना आपले दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे म्हणून अत्यंत उपयुक्त आहेत. पतंजलींचा अष्टांग योग म्हणजे जीवनाचा उद्धार करणारा शास्त्रीय मार्ग होय. बऱ्याच जणांना योग हा एक अध्यात्मिक मार्ग वाटतो. परंतू नीट पाहिल्यास त्यात कुठेही भक्तीचे प्रदर्शन नाही. कर्म कांडे नाहीत, पूजा अर्चा नाही उपास तापास नाहीत. आहे केवळ जीवन कसे जगावे व आपला उद्धार कसा करावा याचे शास्त्रशुद्ध विवेंचन! म्हणूनच प्रत्येकाने मग तो कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा असूदे, स्त्री असूदे अथवा पुरुष, प्रत्येकाने योग समजून घ्यायलाच हवा. मरण येत नाही म्हणून जगण्यापेक्षा शेवटच्या दिवसापर्यंत आनंदाने मी कसे जगेन याचे खात्रीपूर्वक ज्ञान देणारे एकमेव शास्त्र म्हणजे योगशास्त्र होय.
आतापर्यंत आपला देह किती महत्वाचा हे आपण पाहिले. आज त्या देहात असणाऱ्या प्राणाविषयी आपण जाणून घेऊया.
पृथ्वी, जल, अग्नि वायू व आकाश यांना पंचमहाभुते म्हणतात. यातील सर्वात शुक्ष्म तत्व म्हणजे आकाश. इतर सर्व तत्वे शेवटी अवकाशात विलिन होतात. प्राण ही मनुष्याचा विकास करणारी, अनंत, सर्वव्यापी व कारणभुत अशी शक्ती आहे. प्राणाचे खरे स्वरुप जाणून घेणे, आणि त्याचा संयम साधण्याचा प्रयत्न करणे हा खरा प्राणायाम होय. प्राणायाम ज्याला साधला त्याला अनंत शक्तीचे द्वार जणू खुले होऊन जाते. प्रकृतीला वशीभूत करण्याचे सामर्थ्य त्यास पाप्त होते. आणि ते तसे करुन घेणे हेच प्राणायामाचे लक्ष आहे. प्राणायाम साधण्यासाठी ज्या अनेक क्रिया कराव्या लागतात. त्यापैकी श्वासोच्छवासाचे नियमन ही एक क्रिया आहे. श्वास हा प्राणाच्या जवळ आहे. कारण श्वास थांबला की प्राण निघून जातो. म्हणुनच श्वासाचा धागा पकडून आपल्याला प्राणापर्यंत पोहचता येते; प्राणाला समजून घेता येते. स्वामी विवेकानदांनी आपल्या ज्ञानयोग ह्या पुस्तकात अशाप्रकारे प्राणायामाचे स्वरुप खुप सुंदर रित्या समजाऊन सागितले आहे.
बऱ्याच वेळा श्वास घेणे आणि सोडणे यास लोक प्राणायाम समजतात. प्राणाचे स्वरूप नीट समजणे गरजेचे आहे. सर्व सृष्टीत प्राण भरून राहिला आहे. त्यातील काही अंश आपल्यात आहे. जोपर्यंत आपले शरीर ठीकठाक आहे तोपर्यंत प्राण आपल्या शरीरात राहतो. शरीर खराब किंवा निकामी झाल्यास प्राण आपल्या देहास सोडून बाह्य प्राणात मिसळतो. त्याबरोबर पंच महाभूतांनी बनलेले आपले हे शरीर निसर्गातील पंच महाभूतात विलीन होण्याची क्रिया सुरू होते. आपल्या देहाचे हे वास्तव व अस्तित्व ध्यानात आले की आपले लक्ष बाह्य जगतात फारसे रमत नाही. आपल्याला येणाऱ्या समस्या, सूख – दुखांची नश्वरता ध्यानात येऊ लागते. व अंतरंगाची ओढ लागते. अंतरंगात मात्र दुःख नाही तिथे आहे केवळ शांती. म्हणून शरीराची काळजी घेता घेता प्राणाचा देखील अभ्यास करावा. त्याने एकाग्रता वाढते. शरीर व मनात संतुलन निर्माण होते.
प्राणायामाचा आणखी एक अर्थ आहे फुप्फुसाच्या क्रियेवर ताबा मिळवणे आपल्या फुप्फुसाच्या आकुंचन प्रसरण क्रियेमुळे श्वासोच्छवास चालतो. फुप्फुसांची ही क्रिया नीट न चालल्यामुळे अनेक रोगांचा आपल्या शरीरात शिरकाव होतो. ही झाली बाह्य स्थिती. पुढे थोडे खोलात गेले तर या सर्व श्वसन यंत्रणे बाबतच आश्चर्य वाटू लागते. फुप्फुसांचे आकुंचन प्रसरण कोण घडवून आणते? आणि मग ही प्राणशक्ती अनुभवास येऊ लागते. प्राणायाम क्रिया करणे म्हणजे जिच्यामुळे फुप्फुसाची क्रिया चालते त्या फुप्फुसांना सक्षम करणे, त्या फुप्फुसांच्या स्नायुशक्तीवर ताबा मिळवणे होय. आपल्याला एखाद्या स्नायुची किंवा अवयवाची शक्ती प्रयत्नपूर्वक वाढवता येते. जसे थोड्या प्रयत्नाने आपला कान आपल्याला हलवता येतो. याचे कारण म्हणजे त्या ठीकाणाच्या प्राणशक्तीस आपण चालना देतो. याउलट काही शक्तीचा आपण उपयोग करीत नसल्यास तीचा आपोआप -हास होतो. आधुनिक माणसांतील अशा अनेक शक्तीचा, विशेषतः शारीरीक शक्तीचा -हास झालेला दिसतो. त्यामुळे अनेक व्याधींनी तो ग्रस्त झालेला आढळतो.
प्राण शक्तीचे हस्तांतरण होते. हे माहीत आहे का? आपल्या अवतीभवती बरे आणि वाईट दोन्ही प्रवरुत्तीची लोक वावरत असतात. त्यांच्या चांगल्या आणि वाईट गुणांचा आपल्यावर परिणाम होत असतो. तो का होतो? त्यांच्यामध्ये असलेली सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात शिरत असते. काही उदाहरणे पहा…
एखादा रोगी डॉक्टरकडे जातो; अगदी चालता येत नाही त्याला! परतू परत येतांना मात्र त्याच्या चालण्यात फरक पडलेला असतो. अशी काय जादू झाली. काही नाही केवळ डॉक्टरचे अश्वासक शब्दांनी त्याला धीर दिला. आणि औषध घेण्याआधीच पन्नास टक्के तो बरा झाला. दुबळ्या माणसाबरोबर एखादा बलवान माणूस चालत असेल तर त्याला धीर येतो. थोडक्यात काय डॉक्टर किंवा बलवान माणसात रोगी व दुर्बल माणसापेक्षा अधिक प्राणशक्ती असते आणि तो आपल्या संपर्कात असणा-यात संक्रमीत करतो हे निश्चित ! म्हणून आपला मित्रपरिवार निवडतांना तो असाच निवडावा की जो आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल. मानसिक दुर्बलतेकडे नेणारे प्रसंग व व्यक्तींना शक्यतो टाळावे.
प्राण ही एक जैवीक शक्ती आहे. ती काळजीपुर्वकच समजून घ्यावी लागेल. आपल्या अंगी असलेली अल्पशी प्राणशक्ती ह्या विश्र्वातील अनंत शक्तीशी जोडायची आहे. तसे जमले तर अनेक शारीरीक व मानसिक व्यार्थीपासून आपली मुक्ती होईल. व मनाच्या एका उच्चत्तम अवस्थेचा आपण अनुभव घेऊ शकू.
प्राणायामाच्या अभ्यासाने स्थिरता प्राप्त होते उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. त्यामुळे प्राणायाम तंत्राची रचना अशी असावी की ह्या जैविक शक्तीची जाणीव आपणास अधिकाधिक चांगल्या त-हेने होईल. नवीन साधकाने या तंत्रांचा अवलंब करताना आपल्या आंतरिक बदलावर बारीक लक्ष ठेवावे. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान अधिक होईल. म्हणूनच श्वसनाचा एखादा आजार झाल्यास _’जा प्राणायम कर_ असे सांगणा-या डॉक्टरचे प्राणायामाबद्दल कीती अज्ञान आहे हे दिसून येते.
_श्वासाचा सबंध आयुष्याशी आहे असे दिसते._
बरीचशी कासवे २०० ते ३०० वर्षाची आहेत. याउलट सशाचे आयुष्य १ ते २ वर्षांचे आहे. कुत्री तर २० वर्षाहून अधिक काळ जगत नाहीत. काय कारण असेल? कासव कीवा हत्ती मिनिटाला फार कमी श्वास घेतात. याउलट ससा किंवा कुत्र्याच्या श्वासाची गती खुप असते. योगी मिनिटाला १ ते २ च श्वास घेतो. म्हणून त्याचे आयुष्य खुप असते. सामान्य माणूस मिनिटाला १५ ते २० श्वास घेतो. याहून श्वासाची गती अधिक झाल्यास रोगांची निर्मिती होते. थोडक्यात काय तर श्वासाची गती कमी करणे हे प्राणायामाचे लक्ष असते. भावनाशिल व आजारी व्यक्तींचा श्वास अनियमित होतो. अशा व्यक्ती अशांत व गोंधळलेल्या असतात. म्हणूनच योगाचे महत्त्वाचे उद्दिष्ट भावनेवर नियंत्रण मिळवणे हे असते.
प्राणायाम हा आपल्याला आपल्या स्थूल देहापासून अलिप्त करतो. हलकेपणाचा अनुभव देतो. जीवनाची उत्तम अवस्था जाणीवेच्या कक्षेत आणतो. दीर्घ श्वसनामुळे शरीरास भरपूर ऑक्सिजन मिळतो. शरीराची कार्यक्षमता वाढवतो. म्हणून याचा नीट अभ्यास करून प्रत्येकाने तो नित्य नेमाने करावा.
– दिनेश पेडणेकर, योग शिक्षक (मंडणगड)
मोबाईल 9420167413