(वेळणेश्वर / उमेश शिंदे)
सायंकाळी फिरायला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून पलायन करणाऱ्या चोरट्याला गुहागर पोलिसांनी अवघ्या दोन तासात पकडून त्याला गजाआड केले आहे. चोरीची घटना ११ मार्च रोजी सायंकाळी जामसूत येथे घडली होती.
गुहागर तालुक्यातील जामसूत दत्तवाडी येथील प्रेमलता साळवी (वय ७०) ही वृध्द महिला ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जामसूत पेट्या जवळ बोऱ्या –पिंपर रस्त्यावर फिरत होत्या. दरम्यान, ५.१५ च्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराने साळवी यांच्या गळ्यातील सोन्याची माळ (अंदाजे किंमत ६५ हजार) खेचून पलायन केले. या चोरीची फिर्याद गुहागर पोलिस ठाण्यात तत्काळ देण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते हे आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जामसूत व पिंपर गावातील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज व ग्रामस्थांकडून माहिती घेऊन जलदगतीने तपास सुरु केला.
सीसीटीव्हीत दिसणारा संशयीत चोर काळ्या रंगाची गाडी, तोंडाला मास्क व टोपी घातलेला आढळून आला. कसून चौकशी केली असता माळ खेचणारा संशयित चोरटा नरवण (पंघरवणे) येथून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आला. प्रशांत नंदकुमार पाटेकर (वय ३४) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे.
त्याच्यावर भा.दं. वि. कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. चोरीचा तपास दोन तासात लावणाऱ्या गुहागर पोलिसांच्या या टीममध्ये पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते ,पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे, हे. काँ. स्वप्नील शिवलकर, हेड कॉन्स्टेबल हनुमंत नलावडे, हेड कॉन्स्टेबल लुकमान तडवी, कॉन्स्टेबल वैभवकुमार चोगले, प्रितेश रहाटे, उदय मोनये, अमोल गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.
या आधी सुद्धा चिखली येथील खुनातील आरोपी हा काही तासांमध्ये पकडण्यात गुहागर पोलिसांना यश आले होते. पोलिसांच्या या कामगिरीमुळे तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. असाच इतरही गुन्ह्याचा शोध त्यांनी जलद गतीने करावा अशी तालुक्यातील जनतेमधून बोलले जात आहे.